Bihar news : बिहार राज्यातील कैमूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाला साप चावल्यानंतर तो उपचारासाठी रुग्णालयात धावत जात असतांना असताना दारू प्यायल्याचा संशयावरून पोलिसांनी त्याला पकडलं. तसेच सुटकेसाठी त्याला लाच मागीतली. दरम्यान, त्याला दवाखान्यात पोहचण्यास उशीर झाल्याने या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून मृत तरुणाच्या नातेवाइकांनी आरोपी पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
कैमूर जिल्ह्यात साप चावल्यानंतर हॉस्पिटलच्या दिशेने धावणाऱ्या एका २३ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. पोलिसांनी या तरुणाला मद्यप्राशन केल्याचा संशय व्यक्त करून अटक केली होती. राम लखन प्रसाद असे मृत्युमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. राम लखन प्रसाद याला साप चावल्याने तो दवाखान्यात जात होता. मात्र, पोलिसांना तो दारू प्यायला असल्याचा संशय आला. यामुळे त्यांनी त्याला अटक केली. तसेच त्याच्या सुटकेसाठी त्याला २ हजार रुपये मागितल्याचा आरोप राम लखन प्रसादच्या कुटुंबीयांनी केला. दरम्यान, त्याच्या मोठ्या भावाने पोलिसांना ७०० रुपये देऊन त्याची सुटका केली. मात्र, तो पर्यंत उशीर झाला होता. साप चावून त्याला तीन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने व या काळात दवाखान्यात न पोहोचल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) शिव शंकर कुमार यांनी पोलिसांनी लाच मागितल्याचा दावा फेटाळला आहे.
कैमूरचे पोलीस अधीक्षक ललित मोहन शर्मा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांना या घटनेची चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे देखील ललित मोहन शर्मा यांनी सांगितलं आहे.
मृत कुटुंबीयांनी सांगितले की, प्रसाद याला बुधवारी रात्री चैनपूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या निमियातांड गावात त्यांच्या शेतात साप चावला. त्यानंतर प्रसाद जवळच्या हॉस्पिटलच्या दिशेने पळू लागला. यावेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या वाहनाने त्याला थांबवले. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, त्याला अवैध मद्यपान केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते.
"माझ्या भावाने पोलिसांना वारंवार सांगितले की, त्याला साप चावला आहे, आणि तो जवळच्या रुग्णालयात जाण्यासाठी धावत आहे. परंतु पोलिसांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. आणि त्याच्या सुटकेच्या बदल्यात २ हजार रुपयांची मागणी केली. यामुळे त्याला वेळेत उपचार घेता आले नाही. त्यामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाला,” असा आरोप मृत व्यक्तीचा मोठा भाऊ जोगिंदर बिंद यांनी शुक्रवारी केला.
प्रसादने पैसे आणण्यासाठी मला बोलावले तेव्हा तो शेतात पिकांना पाणी देत होता, असे बिंदने सांगितले. "मी, कसा तरी, मध्यरात्री ७०० रुपयांची व्यवस्था केली आणि सायकलवरून पोलिसांनी त्याला थांबून ठेवलेल्या ठिकाणी पोहोचलो. पोलिसांना ७०० रुपये देऊन मी त्याला स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत तो बेशुद्ध झाला होता. गुरुवारी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.