Rajasthan Accident : भिलवाडा जिल्ह्यातील कोत्री भागातील ८ मित्र प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी जात असतांना दुर्दैवी घटना घडली आहे. राजस्थानमधील जयपूर-अजमेर मार्गावर मौखमपुराजवळ समोरून येणाऱ्या भरधाव बसचा टायर फुटून त्यांच्या कारला बसची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात आठही जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
दिनेश कुमार, सुरेश रेगर, बबलू मेवाडा, जानकीलाल, रविकांत मदनलाल, मुकेश उर्फ बाबू रेगर मुलगा मदनलाल, नारायणलाल बैरवा आणि प्रमोद सुथार असे या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ८ मित्रांची नावे आहेत. हे सर्व भीलवाडा जिल्ह्यातील कोत्री भागात राहत असून ते महाकुंभासाठी उत्तर प्रदेश येथे जात होते.
या अपघाताची माहिती देतांना एसपी आनंद कुमार शर्मा यांनी माहिती देतांना सांगितले की, जोधपूर डेपोची रोडवेज बस जयपूरहून अजमेरला जात होती. तर इको कार अजमेरहून जयपूरच्या दिशेने जात होती. यावेळी बसचा टायर अचानक फुटला. यामुळे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस दुभाजकाला धडकून पलटी होऊन थेट दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ईकोकारला जाऊन धडकली. यात कारचा चेंदामेंदा झाला आहे. तर प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, जोधपूर डेपोची बस जयपूरकडून येत असतांना बसचा ड्रायव्हर साईडचा पुढचा टायर फुटला. त्यामुळे बस दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूला जाऊन पलटली व समोरून येणाऱ्या कारवर जाऊन आदळली. या कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या सर्वाचे मृतदेह कारतोडून बाहेर काढण्यात आले.
हे सर्व मित्र, बडलियास येथून गुरूवारी सकाळी १०.३० वाजता निघाले होते. ते प्रयागराज महाकुंभासाठी निघाले होते. प्रयागराज येथील ३ दिवसांचा मुक्काम आटोपून व गंगा नदीचे स्नान करून ते पुन्हा माघारी येणार होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. यातील बबलू मेवाडा हे मांडलगड रेल्वे दूरसंचार विभागात कामाला होते. तर, बबल यांना तीन मुली आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती कुटुंबीयांना देण्यात आलेली नाही. मृतदेह घेण्यासाठी गावातील काही लोक कुटुंबासह जयपूरला रवाना झाले आहेत. आज शुक्रवारी दुपारपर्यंत सर्वांचे मृतदेह गावात आणले जाणार आहेत. सरकारने प्रत्येक मृताच्या कुटुंबाला २१ लाख रुपये व सरकारी नोकरी द्यावी, तरच अंत्यसंस्कार केले जातील, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संबंधित बातम्या