Leopard Entered the Wedding Ceremony: लखनौमध्ये बुधवारी रात्री एका युट्यूबरच्या लग्न समारंभात बिबट्या घुसला. या घटनेमुळे लग्नमंडपात मोठा गोंधळ उडाला. अवध चौकातून दुबग्गाकडे जाणाऱ्या हरदोई बायपासवरील बुधेश्वर येथील एमएम मॅरेज लॉन्स येथे हा विवाह सोहळा पार पडला. बिबट्याला पाहताच सर्वजण सैरावैरा पळू लागले. कॅमेरामनने थेट पायऱ्यांवरून उडी मारली तर वधू-वराने जीव वाचवत धूम ठोकत कारमध्ये जाऊन आसरा घेतला. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच त्यांचे पथक लग्नमंडपात दाखल झाले. यानंतर संपूर्ण लग्नमंडप रिकामे करून टेरेसवर लपून बसलेल्या बिबट्याला जेरबंद केलं.
लग्नसोहळ्याची मेजवानी खाण्यासाठी आलेल्या या घटनेची सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे. ही घटना व्हायरल झाली आहे. बिबट्याला लग्नमंडपात पाहून चेंगराचेंगरी झाली. वधू, वधू आणि पाहुणे जीव मुठीत घेऊन पळाले. वनविभागाच्या पथकाला या घटनेची माहिती ते घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत वन निरीक्षक मुकद्दर अली जखमी झाले आहेत. लग्न समारंभाचा व्हिडिओग्राफर आणि एका मॅरेज लॉन वर्करने छतावरून उडी मारली. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे तीन वाजता वनविभागाच्या पथकाला बिबट्याला पकडण्यात यश आले. यानंतर हा लग्नसोहळा पार पडला.
बुधेश्वर उड्डाणपुलावरून उतरताच एमएम मॅरेज लॉन आहे. आलमबाग पूरण नगरमध्ये राहणाऱ्या युट्यूबर अक्षयचा विवाह विक्रम नगर मध्ये राहणाऱ्या ज्योतीसोबत ठरला होता. लग्न मिरवणूक मंडपात आली. वऱ्हाडींचा नाश्ता सुरू होणार होता. तेवढ्यात रात्री साडेआठच्या सुमारास लॉनच्या पहिल्या मजल्यावर बिबट्या दिसला. व्हिडिओग्राफर अमनच्या सहकाऱ्याने बिबट्याला पाहून आरडा ओरड केली. त्यांनी लॉन मॅनेजरला बिबट्या आल्याची माहिती दिली. यावेळी त्याच्यावर विश्वास न ठेवता बिबट्या नसून मांजर असल्याचं म्हणत त्याला मूर्खात काढले. याच वेळी लॉनचा एक कामगार दुसऱ्या मजल्यावर गेला असता, बिबट्याने त्याच्यावर झडप घातली यात तो गंभीर जखमी झाला.
गेल्या ६३ दिवसांपासून रहमान खेरा येथील जंगलात या बिबट्याच्या शोध सुरू होता. बुधवारी सायंकाळी उशिरा बिबट्याने बुधेश्वरच्या मॅरेज लॉनमध्ये घुसत धुमाकूळ घातला. वनविभाग लग्न मंडपात आल्यावर त्यांनी बिबट्याला पकडणीसाठी मोहीम सुरू केली. रात्री साडेआठ वाजता मॅरेज लॉनमध्ये त्यांनी सापळा रचला. यावेळी वनविभागाच्या पथकावरही बिबट्याने हल्ला चढवला. यावेळी वनविभागाच्या पथकाची देखील तारांबळ उडाली. पुढे असलेले वननिरीक्षक मुकद्दर अली यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांच्या हाताला चावा घेतला. यामुळे ते जखमी झाले. दरम्यान, ट्रँक्विलायझर बंदुकीने बिबट्याला डार्ट मारण्यात आला. यावेळी बिबट्या टेरेसवर गेला. वनकर्मचाऱ्यांनी बाहेर पाडण्याचे सर्व मार्ग बंद केले. दरम्यान, बिबट्या बेशुद्ध झाल्यावर रात्री ३.३० वाजता त्याला पकडण्यात वनकर्मचाऱ्यांना यश आले.
मॅरेज लॉनमध्ये शिरलेला बिबट्या कोणी पाहिला नाही. लोक समारंभाला पोहोचण्यापूर्वीच बिबट्या पहिल्या मजल्यावर घुसून लपला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रात्री साडेआठच्या सुमारास व्हिडिओग्राफरने प्रथम बिबट्याला पाहिला आणि आरडाओरडा केला.
फोटोग्राफीचे काम करणारे अमन खान यांनी सांगितले की, सायंकाळी त्यांचा कर्मचारी बॅग घेण्यासाठी पहिल्या मजल्यावर गेला. यावेळी त्याला बिबट्या दिसला. यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यामुळे त्याने छतावरून उडी मारल्याने त्याच्या पाय फ्रॅक्चर झाला. बिबट्या यानंतर अनेकांना दिसला. यामुळे लग्नमंडपात गोंधळ उडाला. वधू आणि वराला देखील लॉनवर बिबट्या फिरतांना दिसला. यामुळे सर्वांनी खोलीत लपून आपला जीव वाचवला. तर काहींनी लग्न मंडपातून मिळेल त्या मार्गाने पळ काढला.
संबंधित बातम्या