big solar storm will hit earth : सूर्याकडून येणारे एक मोठे सौर वादळ पृथ्वीला धडकणार आहे. गेल्या दोन दशकातील हे सर्वात मोठे सौर वादळ आहे. शास्त्रज्ञांच्या मते, दोन दशकांत पहिल्यांदाच भूचुंबकीय वादळ म्हणजेच सौर वादळ पृथ्वीवर धडकणार आहे. अमेरिकेची वैज्ञानिक एजन्सी नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (एनओएए) ने या बाबत चेतावणी जारी केली आहे. या सौर वादळामुळे कृत्रिम उपग्रहांना धोका निर्माण होऊ शकते. तसेच पृथ्वीवरील पॉवर ग्रीड निकामी होण्याची शक्यता आहे. या सोबतच कम्युनिकेशन नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे बिघडण्याची शक्यता आहे.
अमेरिकन एजन्सीने सांगितले की, हे सौर वादळ आठवड्याच्या शेवटी पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. २००५ नंतरचे हे पहिले सौर वादळ आहे. यामुळे जगभरात अनेक देशात ब्लॅकआउट, उच्च श्रेणीच्या धोकायक रेडिओ लहरींचा धोका निर्माण झाला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार काही शहरात विमान उड्डाणाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. येथील काही विमानांचे मार्ग हे बदलण्यात आले आहेत. तस्मानियापासून ब्रिटनपर्यंतच्या आकाशात हे सौर वादळ दिसणार आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की हे तीव्र श्रेणीचे (G4) भूचुंबकीय वादळ आहे. याआधी २००५ मध्ये हेलोवीन सोलर स्टॉर्म आले होते. तेव्हा स्वीडनमध्ये ब्लॅकआउट झाले होते. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेतील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. खरं तर, सौर वादळामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे ऊर्जा प्रकल्प आणि नेव्हिगेशन यंत्रणेवर परिणाम होतो. अहवालानुसार, तस्मानिया आणि युरोपमधील अनेक भागातील नागरिकांना या सौर वादळाची झलक दिसणार आहे.
सौर वादळे कोरोनल मास इंजेक्शनमुळे तयार होतात, जे सूर्यावर घडणाऱ्या स्फोटांमुळे होतात. जिथे सूर्याकडून येणारा प्रकाश पृथ्वीवर अवघ्या ८ मिनिटात पोहोचतो. तर सिएमई लाटा ८०० किमी प्रति सेकंदाच्या वेगाने धडकतात.
शास्त्रज्ञांच्या मते, सौर वादळामुळे चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल होतो, ज्यामुळे वीज पुरवठ्यामध्ये अडथळे येऊ शकतात. एखाद्या देशात ब्लॅकआउट देखील होऊ शकतो. या वादळामुळे अनेक एलेक्ट्रॉनिक यंत्र खराब होण्याचा देखील धोका असतो. याशिवाय अंतराळयान, उपग्रह यांच्यावर देखील परिमाण होऊ शकतो. नासाने आपल्या अंतराळवीरांच्या संरक्षणासाठी एक टीम तयार केली आहे.
कबुतरांच्या नैसर्गिक \होकायंत्रावरही या सौर वादळाचा परिणाम होऊ शकतो. कबूतर हा असा पक्षी आहे, ज्यांची दिशा समज खूप मजबूत असते. नासाच्या अभ्यासानुसार, सौर वादळांच्या काळात कबुतरे कमी उडतात.