मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Purulia news : हादरवून टाकणारी घटना! सुट्टी मिळावी म्हणून विद्यार्थ्यानं केला आपल्याच शाळेतील मुलाचा खून

Purulia news : हादरवून टाकणारी घटना! सुट्टी मिळावी म्हणून विद्यार्थ्यानं केला आपल्याच शाळेतील मुलाचा खून

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 06, 2024 06:30 PM IST

West Bengal Purulia School Boy Murder News : पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील एका शाळेत हादरवून टाकणारी घटना घडली आहे.

West Bengal News
West Bengal News

purulia school boy murder : हृदय पिळवटून टाकणारी एक घटना पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातून समोर आली आहे. इथल्या एका वस्ती शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्यानं आपल्याच शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा खून केला आहे. शाळेला एक दिवस सुट्टी मिळावी म्हणून हे कृत्य केल्याचं विद्यार्थ्यानं सांगितल्यानं सगळेच चक्रावून गेले आहेत. 

पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला ज्युवेनाइल कोर्टासमोर हजर करण्यात आलं. तिथून त्याला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. 

पुरुलियाचे पोलीस अधीक्षक अभिजित बंडोपाध्याय यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. ती हादरवून टाकणारी होती. ‘आरोपी मुलाला शाळेतून घरी जायचं होतं. एखादी मोठी घटना घडली किंवा कुणाचा मृत्यू झाला तर शाळेला सुट्टी जाहीर केली जाईल, असं त्याला वाटत होतं. म्हणून त्यानं सहा वर्षांच्या चिमुरड्याला मारून टाकलं, असं चौकशीत समोर आल्याचं एसपी बंडोपाध्याय यांनी सांगितलं. तो बोलतोय ते खरं आहे की यामागे आणखी काही आहे याचा तपास आम्ही करत असल्याचं बंडोपाध्याय म्हणाले.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

शारदा शिशू मंदिर शाळेजवळ एक तलाव आहे. या तलावाजवळ मृत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. दुसऱ्या दिवशी मुलाच्या वडिलांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आणि शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला. मुलाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याच्या शरीरावर काही जखमा असल्याचं समोर आलं होतं. यानंतर पोलिसांनी तपास केला असता शाळेत शिकणाऱ्या एका मोठ्या मुलानंच हा खून केल्याचं निष्पन्न झालं. यानंतर आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं रडत रडत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

डोक्यात दगड घातला!

मान बाजार पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही आरोपी विद्यार्थ्याला पकडलं आणि त्याची चौकशी केली तेव्हा त्यानं सांगितलं की त्यानं मुलाला चॉकलेटचं आमिष दाखवलं होतं. नंतर त्याला तो शाळेबाहेर घेऊन गेला. कुणीही फिरकत नसलेल्या शाळेजवळच्या तलावाजवळ त्यानं मुलाला नेलं. तिथं त्यानं मुलाच्या डोक्यावर दगड मारून त्याचा जीव घेतला.

WhatsApp channel

विभाग