odisha news : ओडिशा येथील केओंझार जिल्ह्यात पाटबंधारे विभागातील एका मुख्य अभियंत्याकडे बेहिशेबी मालमत्ता सापडल्याने सर्वांचे डोळे पांढरे झाले आहेत. या अभियंत्याकडे तब्बल ८५ भूखंड व ५ मजली इमारतीसह ३३५ ग्रॅम सोने सापडले आहे. या अभियंत्याची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. या अभियंत्याची राज्यभर चर्चा सुरू आहे.
ओडिशाच्या दक्षता पथकाने शनिवारी केओंझार जिल्ह्यातील पाटबंधारे विभागातील एका मुख्य अभियंत्याला बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात ८५ भूखंड ताब्यात घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या अभियत्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
प्रधान असे या अभियंत्याचे नव असून त्याच्याकडे ८५ भूखंडांव्यतिरिक्त एक पाच मजली इमारत, एक मार्केट कॉम्प्लेक्स, व ३३५ ग्रॅम सोन्याचे दागिने, व ७८ 78 लाख रुपयांची बँकेत ठेवी आहेत. तर त्याच्याकडे ११.७ लाख रुपयांची रोकड देखील सापडली आहे.
त्याच्याकडे असलेल्या ८५ भूखंडांपैकी ८० जलेश्वर (बालासोर जिल्हात), तर ४ भूखंड हे पुरी जिल्ह्यात तर आणखी एक भूखंड पश्चिम बंगालमध्ये आहे. ओडिशात दोन आठवड्यांपेक्षा बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तिसऱ्या सर्वोच्च सरकारी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
बालासोर येथील प्रधान १९९४ मध्ये अभियंता म्हणून रुजू झाला होता. या अभियंत्याला जुलैमध्ये मुख्य अभियंता पदावर बढती मिळाली. त्याने नुकत्याच केलेल्या संपत्तीच्या खुलाशात त्यांनी केवळ काही भूखंड असल्याचा उल्लेख केला होता. सूत्रांनी सांगितले की, दक्षता अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रधान यांच्या बालासोर येथील त्याचे आई वडील राहत असलेल्या घरावर छापा टाकला. तर इतर काही पथकांनी त्याच्या दुसऱ्या घरावर छापा मारला व मोठी मालमत्ता जप्त केली. प्रधान यांचे नातेवाईक व जवळच्या सहकाऱ्यांच्या घरांवर देखील छापे टाकत आहेत. यातून मोठी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारी अधिकाऱ्याकडे सापडलेल्या बेहिशेबी संपत्तीमुळे भराष्ट्राचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.