Central Govt Employee DA Hike : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रातील भाजप सरकारनं निर्णयांचा सपाटा लावला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात केल्यानंतर आता सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूषखबर दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. पेन्शनधारकांनाही तितकाच लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता आता ५० टक्क्यांवर गेला आहे. महागाई भत्त्यातील वाढीमुळं केंद्र सरकारच्या विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.
एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचं मूळ वेतन दरमहा २५,६०० रुपये असेल, तर पूर्वीच्या ४६ टक्के दराने त्याला ११,७७६ रुपये महागाई भत्ता मिळत होता. मात्र, आता महागाई भत्ता ५० टक्के झाल्यानं आता ही रक्कम थेट १२,८०० रुपये होणार आहे. अर्थात, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १०२४ रुपयांनी वाढणार आहे.
महागाई भत्त्यातील वाढ मूळ पगाराच्या आधारे ठरवली जाते. मूळ पगार जितका जास्त, तितका महागाई भत्ता वाढतो. त्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या मूळ पगाराच्या आधारे वाढीव भत्त्याचा आकडा काढता येणार आहे.
वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा भत्ता ५० टक्क्यांपर्यंत गेल्यामुळं घरभाडे भत्ता (HRA) देखील वाढणार आहे. X, Y आणि Z श्रेणीतील शहरे/नगरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता अनुक्रमे ३०, २० आणि १० टक्के करण्यात आला आहे. आत्तापर्यंत X, Y आणि Z श्रेणीतील शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे २७, १८ आणि ९ टक्के घरभाडे भत्ता मिळत असे. नव्या निर्णयामुळं त्यात अनुक्रमे ३, २ आणि १ टक्के वाढ झाली आहे.
भत्त्यांमधील वाढीचा सरकारचा नवा निर्णय जानेवारी २०२४ पासून लागू होणार असल्यानं कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांची डीएची थकबाकी मिळणार आहे. याशिवाय मार्च महिन्याच्या पगारात घरभाडे किंवा इतर भत्तेही जोडले जातील. त्यामुळं चालू महिन्याचा पगार भरघोस असेल.
घरभाडे भत्ता (HRA)
बालशिक्षण भत्ता
बालसंगोपनासाठी विशेष भत्ता
हॉस्टेल सबसिडी
बदली प्रवास भत्ता (Transfer Travel Allowance)
ड्रेस भत्ता
उपदान कमाल मर्यादा (Gratuity Ceiling)
मायलेज भत्ता (वाहन भत्ता)