अमेरिकेतील ६४ वर्षीय महिला आत्महत्या करण्यासाठी सुसाईड पॉडचा वापर करणारी जगातील पहिली व्यक्ती ठरली आहे. मात्र, या महिलेच्या मृत्यूनंतर आता स्वित्झर्लंडमध्ये अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्विस-जर्मन सीमेजवळ सोमवारी दुपारी थ्रीडी प्रिंटेड सुसाईड मशिनमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. या मशिनला टेस्ला ऑफ युथेनेशिया (इच्छामृत्यु) असेही म्हटले जाते. अखेरचा श्वास घेण्यापूर्वी या धोकादायक मशिनने एक भीतीदायक संदेश दिला होता. मशीन म्हणाली, "मरायचं असेल तर हे बटण दाबा'. स्वित्झर्लंड हा अशा मोजक्या देशांपैकी एक आहे जिथे परदेशी लोकांना कायदेशीररित्या इच्छामृत्यूची परवानगी मिळू शकते. सोमवारी आरोग्यमंत्री एलिझाबेथ बॉम-श्नाइडर यांनी ही मशीन कायदेशीर नसल्याचे म्हटले होते. मशीन सुरक्षा विषयक नियमांच्या मागण्यांची पूर्तता करत नाही, त्यामुळे याचा वापर करू नये.
स्थानिक पोलिसांनी सांगितले की, ही घटना जंगलाजवळ घडली आहे. उत्तर स्वित्झर्लंडच्या पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, या मृत्यूप्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांची आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि त्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली चौकशी सुरू आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका डच वृत्तपत्राच्या फोटोग्राफरचाही समावेश आहे. फोटोग्राफरला सुसाईड पॉडच्या वापराचे फोटो काढायचे होते.
स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मशिनला (पॉड) अद्याप वापरासाठी मान्यता मिळालेली नाही. वादग्रस्त मशीनचे चेंबर नायट्रोजनने भरले जाते. मशिन सुरू होताच वापरकर्त्याची ऑक्सिजन पातळी धोकादायक पातळीवर खाली येते. पॉडच्या आतील व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते आणि सुमारे १० मिनिटांच्या आत तिचा मृत्यू होतो. या पॉडला आतूनच नियंत्रित केले जाऊ शकते. त्याच्या आतमध्ये आपत्कालीन एक्झिट बटण आहे.
'एक्झिट इंटरनॅशनल'शी संलग्न असलेल्या 'द लास्ट रिसॉर्ट' या संस्थेचे सहअध्यक्ष फ्लोरियन विलेट हे या महिलेच्या मृत्यूचे एकमेव साक्षीदार होते. हा मृत्यू शांत, वेगवान आणि सोपा असल्याचे त्यांनी सांगितले. 'एक्झिट इंटरनॅशनल'चे संचालक डॉ. फिलिप नित्चेके यांनी मंगळवारी सांगितले की, सारकोने डिझाईनप्रमाणेच कामगिरी केली याचा आनंद आहे. स्वित्झर्लंडमधील वकिलांनी हे उपकरण देशात कायदेशीर मानले जाईल, असा सल्ला दिला होता, असे नीत्स्के यांनी यापूर्वी सांगितले होते.