Dhanbad food Poison News : झारखंडमधील बलियापूर इथं एक धक्कादायक घटना घडली. चाट मसाला आणि पाणीपुरी खाल्ल्यामुळं तब्बल १५० जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. विषबाधेमागचं कारण ऐकून प्रशासनही हादरून गेलं आहे.
विषबाधेमुळं अस्वस्थ वाटू लागल्यानंतर १५० लोकांना शहीद निर्मल महातो मेमोरियल मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी १४६ जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात दोन मुलं आणि दोन महिलांचा समावेश आहे. सर्व रुग्णांना आठवडाभर हलका आणि साधा आहार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
धनबादच्या कर्मतांड ब्लॉक अंतर्गत बलियापूरमधील हुचुकतांड येथे झालेल्या चडक पूजा जत्रा सुरू होती. या जत्रेत चाट आणि पाणीपुरीचे तीन स्टॉल होते. याच स्टॉल्सवरील पाणीपुरी खाल्ल्यामुळं लोक आजारी झाले. दुकानदाराच्या चौकशीनंतर यातील धक्कादायक सत्य समोर आले.
चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, लोकांनी जो चाट आणि पाणीपुरी खाल्ली, त्यात मेलेली पाल पडली होती. पण ५ हजार रुपयांचा माल बनवलेला असल्यानं दुकानदारानं पाल काढून फेकली पण चाट आणि पाणीपुरी तशीच विकायला ठेवली. जत्रेसाठी आलेल्या जवळपास सात ते आठ गावातील लोकांनी तो चाट आणि पाणीपुरी खाल्ली. ते खाताच लोकांना उलट्या आणि इतर पोटाचे त्रास होऊ लागले. त्यामुळंच एकच खळबळ उडाली.
काहीतरी गडबड असल्याचं लक्षात येताच १०० जणांना एकाच वेळी धनबाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण दाखल झाल्यानं डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफही चक्रावला. सुमारे ५० जणांवर धनबादच्या विविध खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
संबंधित बातम्या