मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Tata Stocks: जबराट! टाटाच्या 'या' शेअर्सनी दिले वर्षभरात ७५० टक्क्यांपर्यंत रिटर्न्स

Tata Stocks: जबराट! टाटाच्या 'या' शेअर्सनी दिले वर्षभरात ७५० टक्क्यांपर्यंत रिटर्न्स

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 08, 2022 05:49 PM IST

Tata Group Stocks: टाटा समूहाच्या पाच कंपन्यांनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना अक्षरश: मालामाल केलं आहे.

Tata Group
Tata Group

Tata Group Stocks: मागील वर्षभरापासून शेअर बाजारात अस्थिरतेचं वातावरण असतानाही काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मजबूत फायदा मिळवून दिला आहे. टाटा समूहातील तीन कंपन्यांचा यात समावेश आहे. इंडियन हॉटेल्स, टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड आणि ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग अँड असेंब्लीस या कंपन्यांनी गुंतवणूकदांरांना भरभरून रिटर्न्स दिले आहेत. ओरिएन्ट हॉटेल्स, टाटा पावर, टाटा मोटर्स या कंपन्यांनीही गुंतवणूकदारांना निराश केलेले नाही. गुंतवणूकदारांना ८० ते ७५० टक्क्यांपर्यंत नफा मिळवून देणाऱ्या या पाच कंपन्या कोणत्या? पाहा…

ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग अँड असेंब्लीस

ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग आणि असेंब्लीस या कंपनीनं गेल्या वर्षभरात भागधारकांना सर्वाधिक नफा मिळवून दिला आहे. कंपनीच्या शेअरची किंमत एका वर्षात ५५ रुपयांवरून ४८५ रुपयांवर गेली आहे. दीर्घकालीन गुंतवणूक केलेल्यांना ७५० टक्क्यांपर्यंत फायदा झाला आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत १०० टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअरनं ९२५.४५ रुपये प्रति शेअर हा उच्चांक नोंदवला आहे.

टाटा टेलीसर्विस (महाराष्ट्र) लिमिटेड

मागच्या वर्षात या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ झाली असून शेअरचा भाव ३५ रुपयांवरून १२५ रुपयांपर्यंत गेला आहे. कंपनीनं गुंतवणूकदारांना सुमारे २५० टक्के परतावा दिला आहे. जानेवारी ते मार्च २०२२ या दरम्यान गुंतवणूकदारांना विक्रीचा सपाटा लावल्यानं हा शेअर गडगडला होता. मात्र, गेल्या महिनाभरात शेअरच्या किमतीत पुन्हा जवळपास १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इंडियन हॉटेल्स

टाटा समूहाचा हा शेअर देखील मल्टीबॅगर ठरला आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरची किंमत १४२ रुपयांवरून ३१३.८० पर्यंत गेली आहे. कंपनीनं एका वर्षात १२० टक्के परतावा दिला आहे. त्याचवेळी, या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअरनं ७५ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. मागच्या अवघ्या एका महिन्यात या शेअरची किंमत १५ टक्क्यांनी वाढली आहे.

ओरिएन्ट हॉटेल्स

ओरिएन्ट हॉटेल्सने गेल्या एका वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. कंपनीच्या शेअरची किंमत ३५ रुपयांवरून ६८ रुपयांपर्यंत वाढली आहे. यावर्षी कंपनीनं जवळपास ९० टक्के परतावा दिला आहे.

टाटा एलेक्सी

गेल्या एका वर्षात टाटा एलेक्सीच्या शेअरची किंमत ८० टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीच्या एका शेअरची किंमत ४,८५० रुपयांवरून ८८५० रुपयांपर्यंत वाढली आहे. चालू वर्षात या कंपनीनं ५० टक्के परतावा दिला आहे.

 

(वैधानिक इशारा: सदर बातमीत केवळ शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

WhatsApp channel

विभाग