मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Goa Rain News : धुवांधार पावसामुळं केबल पूल कोसळला; दूधसागर धबधब्यात ४० पर्यटक अडकले

Goa Rain News : धुवांधार पावसामुळं केबल पूल कोसळला; दूधसागर धबधब्यात ४० पर्यटक अडकले

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 15, 2022 08:47 AM IST

Goa Rain Updates : गेल्या २४ तासांपासून गोवा आणि कर्नाटकच्या सीमाभागात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं दूधसागर अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.

Dudhsagar Falls Goa
Dudhsagar Falls Goa (HT)

Dudhsagar Falls Goa : गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण गोव्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं प्रसिद्ध दूधसागर धबधब्याच्या मार्गावर असणारा एक केबल पूल कोसळला आहे. त्यामुळं जवळपास ४० पर्यटक अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी गोवा आणि कर्नाटकच्या सीमाभागात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. परिणामी दूधसागर धबधब्याचं पात्र मोठं झालं. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळं मार्गातील केबल पूल कोसळला. त्यामुळं ४० पर्यटक पुलापलीकडे अडकले.

त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक लोकांना आणि प्रशासनाला समजताच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. याशिवाय रिव्हर लाइफसेव्हर या संस्थेनंही जीवरक्षकांची टीम घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यात त्यांना सर्व ४० पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रिव्हर लाइफसेव्हर या संस्थेचे आभार मानले आहेत.

मुसळधार पाऊस आणि पाण्याची पातळी वाढल्यानं पुढचे काही दिवस दूधसागर धबधब्यात न जाण्याचा इशारा दृष्टी मरीननं पर्यटकांना दिला आहे. याशिवाय दूधसागर धबधब्याच्या मार्गात जीवरक्षकांची तैनाती करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point