Kerala kozhikode hospital news : केरळमधील कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचे प्रकार सुरूच आहेत. रुग्णाच्या पोटात कात्री राहिल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता याच रुग्णालयात भलताच धक्कादायक प्रकार घडला आहे. बोटावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या एका मुलीच्या जिभेवर इथल्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं संताप व्यक्त होत आहे.
चार वर्षांच्या चिमुकलीसोबत ही भयंकर घटना घडली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या एका हाताला सहा बोटे होती. अतिरिक्त बोट काढण्यासाठी कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेलं होतं. मुलीच्या सहा बोटांपैकी एक बोट छोट्याशा शस्त्रक्रियेद्वारे काढता येईल असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळं नातेवाईक देखील शस्त्रक्रियेसाठी तयार झाले.
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, शस्त्रक्रियेची सर्व तयारी करण्यात आली. ठरल्याप्रमाणे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रत्यक्षात शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा मुलीला परत आणलं गेलं, तेव्हा तिला पाहून नातेवाईकांना अक्षरश: धक्का बसला. कारण त्या मुलीच्या तोंडाला प्लास्टर करण्यात आलं होतं. हा काय प्रकार आहे हे काही क्षण नातेवाईकांना कळलंच नाही. त्यांनी मुलीचा हात पाहिला तर सहावं बोट तसंच होतं.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी नर्सला विचारलं. त्यांचा प्रश्न ऐकून ती हसायला लागली. ती म्हणाली, आम्हाला सांगितलं गेलं की मुलीला जिभेचा त्रास आहे. म्हणून आम्ही जिभेवर शस्त्रक्रिया केली. काही वेळातच डॉक्टर आले. हा प्रकार फारच गंभीर असल्याचं लक्षात येताच त्यांनी चुकीबद्दल नातेवाईकांची माफी मागितली. मुलीचं सहावं बोट आम्ही काढतो असं सांगून ते मुलीला घेऊन गेले.
इन्स्टिट्यूट ऑफ मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थचे अधीक्षक डॉ. अरुण प्रीत यांनी स्थानिक मीडियाशी संवाद साधताना या चुकीची कबुली दिली आहे. अशी चूक झाली आहे. संवादाच्या अभावामुळं हे घडलं आहे. आम्ही याची चौकशी करणार आहोत. या शस्त्रक्रियेमुळं चिमुकलीच्या प्रकृतीवर काहीही परिणाम होणार नाही, असं अरुण प्रीत यांनी स्पष्ट केलं.
हे वृत्त समोर आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हे रुग्णालय आधीच वादात असताना ही घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी हर्शिना नावाच्या ३० वर्षीय महिलेवर याच रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी तिच्या पोटात कात्री राहिल्याचं समोर आलं होतं. सुरुवातीला डॉक्टर हे मान्य करायला तयार नव्हते. शेवटी ती महिला आंदोलनाला बसली. अनेक दिवस आंदोलन केल्यानंतर तिच्या तक्रारीची शहानिशा करण्यात आली. तर तिची तक्रार खरी ठरली आणि दोषी कर्मचाऱ्यांची ओळख पटली. त्यानंतर आता हा प्रकार घडला आहे.
संबंधित बातम्या