Rahul Gandhi News: महाराष्ट्रातील विधानसभेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. '२०१९च्या निवडणुकीनंतर पाच वर्षांत महाराष्ट्रात ३२ लाख मतदार जोडले गेले. परंतु, लोकसभा २०२४ आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ३९ लाख मतदारांची भर पडली. पाच महिन्यांत इतके मतदार कसे सामील झाले? ही संख्या हिमाचल प्रदेशच्या एकूण मतदारांच्या संख्ये इतकी आहे. हे मतदार कुठून आले?' असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले. तसेच निवडणूक आयोगाने या प्रश्नांची उत्तरे मागूनही दिलेली नाहीत, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.
गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तफावत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. पाच महिन्यांच्या अल्पावधीत ३९ लाखांहून अधिक मतदारांची मतदार यादीत भर पडली आहे. महाराष्ट्राच्या यादीत समाविष्ट झालेल्या मतदारांची संख्या हिमाचल प्रदेशच्या एकूण मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रात अचानक मोठ्या संख्येने मतदार तयार झाल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे मतदार यादी सादर करण्याची मागणी केली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुका आणि २०१४ च्या लोकसभा दरम्यानच्या ५ वर्षांत ३२ लाख मतदार जोडले गेले. मात्र, लोकसभा २०२४ मध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले. पण त्यानंतर पाच महिन्यात झालेल्या विधानसभेत उलट चित्र पाहायला मिळाले. विधानसभेत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. आम्ही त्याचा तपास करीत आहोत. महाराष्ट्र निवडणुकीतील त्रुटींबाबत युती निवडणूक आयोगाला सांगत आहोत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदारांच्या याद्या आम्हाला द्याव्यात, अशी मागणी राहुल गांधींनी केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीयांचा आरोप फेटाळून लावला आहे. निवडणूक आयोगाने सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे दिली आहेत. ८ फेब्रुवारीच्या दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर आपला पक्ष दिल्लीत कुठेही राहणार नाही? हे माहित असल्याने राहुल गांधी कव्हर फायर करत आहेत. म्हणूनच ते काहीही बोलतील. नव्या कथा तयार करतील, याचा ते सराव करत आहेत.राहुल गांधी यांनी आत्मपरीक्षण केले नाही आणि खोटे बोलून स्वत:चे सांत्वन करत राहिले तर त्यांच्या पक्षाचे पुनरुज्जीवन शक्य नाही. राहुल गांधी यांनी आपल्या पराभवाचे आत्मपरीक्षण करावे.
भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या सत्ताधारी एनडीए आघाडीने महाराष्ट्रात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत विधानसभेच्या २८८ पैकी २३५ जागा जिंकल्या आणि महाविकास आघाडीला ४९ जागांवर रोखले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपप्रणित आघाडीला पराभूत केल्यानंतर असा निकाल लागला आहे.
संबंधित बातम्या