Narendra Modi Cabinet : मोदी सरकार 3.0 मध्ये ७ महिलांना मंत्रिपदे, ३३ नव्या चेहऱ्यांना संधी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Narendra Modi Cabinet : मोदी सरकार 3.0 मध्ये ७ महिलांना मंत्रिपदे, ३३ नव्या चेहऱ्यांना संधी

Narendra Modi Cabinet : मोदी सरकार 3.0 मध्ये ७ महिलांना मंत्रिपदे, ३३ नव्या चेहऱ्यांना संधी

Jun 10, 2024 12:05 AM IST

Narendra Modi Cabinet 3.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शपथ घेतलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण ७२ पैकी ७ महिलांचा समावेशआहे. तसेच ३३ सदस्य पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत.

मोदी सरकार 3.0 मध्ये ७ महिलांना मंत्रिपदे
मोदी सरकार 3.0 मध्ये ७ महिलांना मंत्रिपदे (ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७१ मंत्र्यांसह सलग तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. पंतप्रधान मोदी यांच्यासह शपथ घेतलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण ७२ पैकी ७ महिलांचा समावेश आहे. ५ जून रोजी बरखास्त झालेल्या मागील मंत्रिमंडळात १० महिला मंत्री होत्या. यावेळी मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्री डॉ. भारती पवार, साध्वी निरंजन ज्योती, दर्शना जरदोश, मीनाक्षी लेखी आणि प्रतिमा भौमिक यांचा समावेश आहे.

नव्या एनडीए सरकारमधील केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या महिला -

निर्मला सीतारामन (भाजप) : राज्यसभेच्या सदस्या निर्मला सीतारामन मागील सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री होत्या. सीतारामन या केंद्रीय मंत्रिमंडळातील दोन महिलांपैकी एक आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा हा सलग तिसरा कार्यकाळ आहे.

अन्नपूर्णा देवी (भाजप) : झारखंडच्या ओबीसी नेत्या अन्नपूर्णा देवी या केंद्रीय मंत्रिमंडळातील दुसऱ्या महिला आहेत. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा पाठिंबा बळकट करण्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यापूर्वी आरजेडीशी संबंधित असलेल्या अन्नपूर्णा देवी यांनी पतीच्या निधनानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी झारखंड आणि संयुक्त बिहारमध्ये राज्यात मंत्री म्हणून काम केले आहे.

सावित्री ठाकूर (भाजप) : सावित्री ठाकूर (४६) यांनी रविवारी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मध्य प्रदेशातील प्रमुख आदिवासी नेत्या असलेल्या ठाकूर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत धार मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.  २०१९ च्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते.

निमुबेन बांभानिया (भाजप) : गुजरातमधून भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या तीन महिलांपैकी निमुबेन बांभानिया या एक आहेत. भावनगर मतदारसंघातून  त्यांनी आम आदमी पक्षाचे उमेश मकवाना यांचा ४.५५ लाख मतांनी पराभव केला. माजी शिक्षिका असलेल्या निमुबेन  २००९-१० आणि २०१५-१८ या दोन वेळा भावनगरच्या महापौर होत्या आणि २०१३ ते २०२१ दरम्यान भाजप महिला मोर्चाच्या राज्य शाखेच्या उपाध्यक्ष होत्या.

रक्षा खडसे (भाजप) : भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांच्या सून राज्यमंत्री रक्षा खडसे (३७) या महाराष्ट्रातून तीन वेळा खासदार आहेत. २०१३ मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते मनीष जैन यांच्याकडून किरकोळ पराभव झाल्यानंतर पती निखिल यांनी आत्महत्या केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी जैन यांच्याविरोधात रावेरमधून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा तीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा २.७२ लाख मतांनी पराभव केला होता. खडसे यांनी संगणक शास्त्रात B.Sc पदवी घेतली आहे.

शोभा करंदलाजे (भाजप) : कर्नाटकातील धार्मिक अतिरेक्यांच्या प्रखर टीकाकार शोभा करंदलाजे (५७) यांनी यापूर्वी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय असलेले करंदलाजे तीन वेळा लोकसभेचे सदस्य आहेत. करंदलाजे यांनी बेंगळुरू उत्तर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या एम. व्ही. राजीव गौडा यांचा २,५९,४७६ मतांनी पराभव केला आणि बेंगळुरूच्या पहिल्या महिला खासदार बनल्या.

अनुप्रिया पटेल (अपना दल): केंद्रीय मंत्रिमंडळात पुनरागमन करणाऱ्या अनुप्रिया पटेल या इतर मागासवर्गीय (ओबीसी) कुर्मी समाजातील प्रमुख नेत्या आणि अपना दलाचे संस्थापक दिवंगत डॉ. सोनेलाल पटेल यांच्या कन्या आहेत. मागील सरकारमध्ये त्या वाणिज्य राज्यमंत्री होत्या. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर मतदारसंघात त्यांनी समाजवादी पक्षाच्या रमेशचंद बिंद यांचा ३७ हजार ८१० मतांनी पराभव केला.

३३ नव्या चेहऱ्यांना संधी -

नव्या चेहऱ्यांमध्ये केरळमधून भाजपचे पहिले खासदार बनून इतिहास रचणारे अभिनेते सुरेश गोपी यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर कमलेश पासवान (उत्तर प्रदेश), सुकांता मजुमदार (पश्चिम बंगाल), दुर्गा दास उईके (मध्य प्रदेश), राजभूषण चौधरी (बिहार), सतीश दुबे (बिहार), संजय सेठ (झारखंड), सी. आर. पाटील (गुजरात), भगीरथ चौधरी (राजस्थान), हर्ष मल्होत्रा (दिल्ली), व्ही सोमन्ना (कर्नाटक), सावित्री ठाकूर (मध्य प्रदेश), मुरलीधर मोहोळ (महाराष्ट्र)हे पहिल्यांदाच भाजपकडून निवडून आले आहेत.

कमलजीत सहरावत (दिल्ली), प्रतापराव जाधव (महाराष्ट्र), जॉर्ज कुरियन (केरळ), कीर्ती वर्धन सिंह (उत्तर प्रदेश), तोखन साहू (छत्तीसगड), भूपती राजू श्रीनिवास वर्मा (आंध्र प्रदेश), निमुबेन बंभनिया (गुजरात), पवित्रा मार्गेरिटा (आसाम) आणि बंडी संजय कुमार (तेलंगणा) यांचाही भाजपकडून प्रथमच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर