उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला असून तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. नियंत्रण रेषेवरील कुपवाडा येथील केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला जात होता. लष्कराने तो हाणून पाडला आहे.
केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी मोहिमेत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा तसेच इतर युद्धजन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती चिनार कॉर्प्सने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
ही कारवाई अजूनही सुरू असल्याचे लष्कराने म्हटले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कुपवाडा येथील पोलिस नियंत्रण कक्षाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना अद्याप या कारवाईबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ६ आणि ७ जुलै रोजी झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. ६ जुलै रोजी चिनिगाममध्ये चार दहशतवादी आणि एक जवान ठार झाला होता, तर मोडरगाममध्ये आणखी एका जवानाचा मृत्यू झाला होता. उर्वरित दोन दहशतवाद्यांना ७ जुलै रोजी मोडरगाम ऑपरेशन संपल्यावर ठार करण्यात आले होते.
२३ जून रोजी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलांनी केलेल्या घुसखोरीविरोधी कारवाईत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते.
भारतीय लष्कराने उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील बसग्रेन गावाजवळ खोऱ्यात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला होता.
एप्रिल महिन्यात लष्कराने रुस्तम चौकीजवळील उरी येथे दोन घुसखोरांना ठार केले होते. उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील सबुरा नाल्याजवळ सुरक्षा दलांनी ठार केलेल्या दोन घुसखोरांना कव्हर फायर दिल्याचा ठपका लष्कराने पाकिस्तानी सैन्यावर ठेवला होता. या वर्षातील घुसखोरीचा हा पहिलाच प्रयत्न होता, जो सतर्क जवानांनी टळला.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लष्कराने उरी सेक्टरमध्ये अशाच प्रकारे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
संबंधित बातम्या