Kadambari Jethwani Issue: मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेल कादंबरी जेठवानी हिला योग्य चौकशी न करता चुकीच्या पद्धतीने अटक करून तिचा छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने भारतीय पोलीस सेवेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
माजी गुप्तचर प्रमुख पी. सीताराम अंजनेयुलू , विजयवाडाचे माजी पोलीस आयुक्त क्रांती राणा टाटा आणि माजी पोलिस उपायुक्त विशाल गुन्नी या अधिकाऱ्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले. ऑगस्टमध्ये जेठवानी हिने एनटीआरचे पोलीस आयुक्त एस. व्ही. राजशेखर बाबू यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली. संबंधित अधिकाऱ्यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते आणि चित्रपट निर्माते के. व्ही. आर. विद्यासागर यांच्यासोबत कट रचल्याचा तिने आरोप केला होता.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यासागर यांच्याशी संगनमत करून तिला आणि तिच्या पालकांना त्रास दिला आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना अटक करून मुंबईहून विजयवाडा येथे नेले, असे तिने फिर्याद दिली. मूळची मुंबईची रहिवासी असलेल्या जेठवानी हिने सांगितले की, पोलिसांनी तिचा आणि तिच्या वृद्ध आई-वडिलांचा अपमान करून त्यांना बेकायदेशीर नजरकैदेत ठेवले. जेठवानीच्या कुटुंबीय ४० दिवसांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिले.
विद्यासागर यांनी जेठवानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अडकवण्यासाठी जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली. पोलिसांनी त्यांना अनेक दिवस जामीन अर्ज दाखल करू दिला नाही, असा आरोप जेठवानी यांचे वकील एन. श्रीनिवास यांनी केला.
अंजनेयुलू यांच्या निलंबनाची माहिती देणाऱ्या सरकारी आदेशात म्हटले आहे की, गंभीर गैरवर्तन आणि कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रथमदर्शनी पुराव्यांमुळे शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अहवालाचा बारकाईने विचार केल्यानंतर आणि प्रकरणाच्या परिस्थितीचा विचार करून सरकारने प्रथमदर्शनी पुरावे आहेत आणि त्यांच्या गंभीर गैरवर्तणुकीबद्दल आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई आवश्यक आहे, असा निष्कर्ष काढला आहे.
एफआयआर दाखल होण्यापूर्वीच अंजनेयुलू यांनी इतर दोन अधिकाऱ्यांना जेठवानीला अटक करण्याचे निर्देश दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. २ फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. तर, ३१ जानेवारी रोजी तिच्या अटकेचे आदेश देण्यात आले होते. हे तीनही अधिकारी १६ आयपीएस कर्मचाऱ्यांमध्ये आहेत, ज्यांना यापूर्वी मेमो जारी करण्यात आला होता, ज्यात त्यांना अधिकृत पोस्टिंगशिवाय दिवसातून दोनदा पोलिस महासंचालक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.