पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतातील तीन मोठे मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि दोन नवीन विमानतळ सुविधांना मंजुरी देण्यात आली.
बेंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी एक महत्त्वपूर्ण मंजुरी आहे, ज्यामध्ये एकूण ४४.६५ किमी लांबीच्या आणि ३१ स्थानकांचा समावेश असलेल्या दोन एलिव्हेटेड कॉरिडॉरचा विकास केला जाईल.
कॉरिडॉर-१ जेपी नगर चौथ्या टप्प्यापासून आउटर रिंग रोड पश्चिमेकडील केंपापुरापर्यंत ३२ स्थानकांसह ३२.१५ किमी चा विस्तार केला जाईल. तर कॉरिडॉर-२ मगदी रोडवरील होसाहळ्ळी ते कडबगेरे पर्यंत नऊ स्थानकांसह १२.५० किमीचा विस्तार केला जाईल.
ठाणे शहराच्या पश्चिमेकडील परिघावर २२ स्थानकांचा समावेश असलेल्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला ही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मेट्रो मार्गावर २०२९ पर्यंत दररोज ६.४७ लाख प्रवासी येण्याची शक्यता असून २०४५ पर्यंत ती वाढून ८.७२ लाख प्रवासी होण्याची शक्यता आहे. १२,२००.१० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे रस्त्यांची कोंडी कमी होईल आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होईल असा शाश्वत वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देऊन ठाण्याची आर्थिक क्षमता उघडण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.
पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्ग विस्तार हा तिसरा मेट्रो प्रकल्प मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. लाइन-१ बी या नावाने ओळखला जाणारा हा नवीन विस्तार ५.४६ किमी चा असून मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर आणि कात्रज उपनगरांना जोडणाऱ्या तीन भूमिगत स्थानकांचा समावेश आहे. २,९५४.५३ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे.
पाटणा आणि सिलिगुडी येथे नवीन विमानतळ सुविधा विकसित करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
१,४१३ कोटी रुपये खर्चून बिहटा येथे नवीन सिव्हिल एन्क्लेव्हविकसित करण्यासाठी नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत बांधली जाईल. ६६,००० चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या टर्मिनलची रचना ३,००० पीक आवर पॅसेंजर (पीएचपी) हाताळण्यासाठी आणि वार्षिक ५० लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सक्षम असेल. भविष्यात दरवर्षी एक कोटी प्रवाशांपर्यंत क्षमता वाढविण्याची तरतूद आहे. या प्रकल्पात ए-३२१/बी-७३७-८००/ए-३२० प्रकारच्या विमानांसाठी १० पार्किंग बे, तसेच दोन लिंक टॅक्सीवेची व्यवस्था करण्याची क्षमता असलेले एप्रोन बांधण्यात येणार आहे.