मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  देशातील ३० पैकी २९ मुख्यमंत्री कोट्यधीश; आंध्रचे मुख्यमंत्री सर्वात श्रीमंत, शिंदेंची संपत्ती किती?

देशातील ३० पैकी २९ मुख्यमंत्री कोट्यधीश; आंध्रचे मुख्यमंत्री सर्वात श्रीमंत, शिंदेंची संपत्ती किती?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 12, 2023 06:38 PM IST

ChiefMinistersinIndiaareMillionaires :असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या रिपोर्टनुसार देशातील ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे सर्वात श्रीमंत आहेत.

Chief Ministers in India are Millionaires
Chief Ministers in India are Millionaires

देशातील राजकीय नेत्यांच्या घरावर ईडी व आयकर विभागाच्या धाडी पडत असल्याने राजकीय नेत्यांची संपत्ती हा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या रिपोर्टमधून मुख्यमंत्र्यांची संपत्ती, दाखल गुन्हे  व असलेल्या देण्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार देशातील ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री  जगन मोहन रेड्डी हे सर्वात श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे ५१० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सर्वात कमी म्हणजे १५ लाख रुपये इतकी संपत्ती आहे.

देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा पत्राचा आधारे एडीआर आणि इलेक्शन वॉच या संस्थांनी हा अहवाल तयार केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या मुख्यमंत्री नसल्याने हे राज्य वगळण्यात आले आहे. सर्व मुख्यमंत्र्यांच्या सरासरी संपत्तीचा आकडा काढला,  तर तो ३३.९६ कोटी रुपये इतका भरतो. ३० पैकी १३ म्हणजे ४३ टक्के मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आदी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर जगनमोहन रेड्डी आहेत. त्यांच्यानंतर अरुणाचल प्रदेशचे पेमा खंडू दुसऱ्या क्रमांकावर आहेत. खंडू यांची संपत्ती १६३ कोटी रुपये इतकी आहे. ओडिशाचे नवीन पटनाईक ६३ कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये प. बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्याकडे अवघी १५ लाखांची संपत्ती असून, केरळच्या पी. विजयन तसेच हरियानाच्या मनोहरलाल खट्टर यांच्याकडे प्रत्येकी एक कोटी रुपयांची संपत्ती आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रत्येकी तीन कोटी रुपयांची संपत्ती आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ११ कोटी ५६ लाख १२ हजार रुपयांची संपत्ती आहे. सर्वाधिक देणे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदे तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची देणी ३ कोटी ७४ लाख ६० हजार रुपयांची आहेत. सर्वाधिक देणी असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये तेलंगणचे के. चंद्रशेखर राव ८ कोटी ८८ लाख रुपयांसह पहिल्या तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ४ कोटी ९९ लाख रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये चंद्रशेखर राव ६४  गुन्ह्यांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. यात ३७ गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर ४७ गुन्हे दाखल असून, त्यातील दहा गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जगनमोहन रेड्डी यांच्यावर ३८ गुन्हे असून, त्यातले ३५ गंभीर स्वरूपाचे आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर १८ गुन्हे दाखल असून, त्यातील एक गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे, असे ADR रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. 

 

WhatsApp channel