मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Accident: अभिनेता यशचा दुचाकीनं पाठलाग करताना वाहनानं उडवलं, २२ वर्षीय चाहत्याचा मृत्यू

Accident: अभिनेता यशचा दुचाकीनं पाठलाग करताना वाहनानं उडवलं, २२ वर्षीय चाहत्याचा मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 10, 2024 11:42 AM IST

कन्नड अभिनेता यशच्या ताफ्याचा पाठलाग करताना बेंगळुरूमध्ये इंजिनीअरिंगच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याचा पोलिसांच्या वाहनाला धडक बसून मृत्यू झाला.

Accident
Accident

Bengaluru Accident: कन्नड अभिनेता यशच्या ताफ्याचा पाठलाग करताना सोमवारी रात्री झालेल्या अपघातात जखमी झालेल्या इंजिनीअरिंगच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याचा मंगळवारी मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशच्या ताफ्याचा पाठलाग करत असताना पीडित निखिल गौडाच्या दुचाकीची पोलिसांच्या वाहनाशी समोरासमोर धडक झाली. ही घटना सोमवारी रात्री उशीरा गडगजवळील मुलगुंड नाका येथे घडली.

यशचा ताफा गडगहून हुबळी विमानतळाच्या दिशेने निघाला होता. सुरानगी गावात वाढदिवस साजरा करण्यासाठी बॅनर लावताना मृत्युमुखी पडलेल्या तिघांच्या कुटुंबियांना भेटून ते निघाले होते. यशने गडग इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे या घटनेत जखमी झालेल्या इतर दोघांचीही भेट घेतली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

यशची एक झलक पाहण्यासाठी गौडा दुचाकीने अभिनेत्याच्या ताफ्याचा पाठलाग करत होता. परंतु, त्याची दुचाकी पोलिसांच्या वाहनाला धडकली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मंगळवारी सकाळी उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. गौडाची दुचाकी यशला घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला धडकल्याची प्राथमिक माहिती आहे.

गौडा हा गडग तालुक्यातील बिंकडाकट्टी गावचा रहिवासी असून तो लक्ष्मेश्वर येथील आगडी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याचे आई- वडील डॉक्टर आहेत. त्याच्या कुटुंबातील तो थोरला मुलगा होता.त्याला नुकतीच एका खासगी कंपनीकडून नोकरीची ऑफर आली होती, गौडाच्या कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना सांगितले.

यशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कटआऊट लावताना गडग मध्ये विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नवीन गाजी (वय, २०), हनुमंत हरिजन (वय, २४) आणि मुरली नाडुविनामणी (वय, २०) यांचा मृत्यू झाला. तर, तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी लक्ष्मेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp channel

विभाग