मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात एका २१ वर्षीय पोपटावर शस्त्रक्रिया करून त्याला वाचवण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पोपटाच्या घशात ट्यूमर होता, ज्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या घशातील सुमारे २० ग्रॅमचा ट्यूमर काढून त्याचे प्राण वाचवले. त्याच्यावर उपचार करणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले की, जिल्ह्यात पक्ष्यातील ट्यूमरची ही पहिलीच घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे सहा महिन्यांपूर्वी पोपटाच्या मालकाला पोपटाच्या गळ्यात गाठ दिसली होती, जी हळूहळू वाढत होती आणि त्यामुळे पोपटाला खूप त्रास होत होता. त्याला नीट बोलता येत नव्हतं आणि काही खाताही येत नव्हतं. त्यानंतर त्याच्या मालकाने त्याला जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालय सतना येथील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले.
तपासणीनंतर पशुवैद्यकांना पोपटाच्या घशात ट्यूमर आढळून आला आणि त्यांनी त्या व्यक्तीला पोपटाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. मालकाची संमती मिळाल्यानंतर डॉक्टरांनी पोपटावर सुमारे दोन तास शस्त्रक्रिया करून रविवारी, १५ सप्टेंबर रोजी सुमारे २० ग्रॅमचा ट्यूमर यशस्वीरित्या काढला. सध्या पोपटाची प्रकृती धोक्याबाहेर असून तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
पोपटावर उपचार करणारे पशुवैद्यक डॉ. बलेंद्र सिंह म्हणाले, "मुख्तियार गंज भागात राहणारे चंद्रभान विश्वकर्मा यांनी शनिवारी १४ सप्टेंबर रोजी आमच्याशी संपर्क साधला आणि सांगितले की त्यांच्या पोपटाच्या घशात ट्यूमर आहे आणि तो हळूहळू वाढत आहे. ज्यामुळे पोपट अन्न खात नाही. दुसऱ्या दिवशी पोपटाच्या शस्त्रक्रियेसाठी आम्ही त्याला बोलावले.
पशुवैद्यकाच्या म्हणण्यानुसार, "ऑपरेशन सुमारे दोन तास चालले. पोपटाचे वजन ९८ ग्रॅम असून पोपटाच्या घशातून सुमारे २० ग्रॅम वजनाचा ट्युमर काढण्यात आला असून तो पुढील तपासणीसाठी रीवा पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. पोपटाच्या घशाच्या भागात ट्यूमर असल्याने ही एक अवघड शस्त्रक्रिया होती.
डॉ. सिंह यांनी पुढे म्हणाले की, शस्त्रक्रियेनंतर पोपट पूर्णपणे स्वस्थ असून ट्यूमर आजारापासून मुक्त झाला आहे. या घटनेनंतर गेल्या दोन दिवसांपासून या पोपटाची तपासणी केली जात असून, त्यात तो पूर्णपणे निरोगी असल्याचे आढळून आले आहे. पोपट आता नीट खात आहे. कोणत्याही प्रकारच्या पक्ष्यामध्ये ट्यूमर ची ही पहिलीच घटना होती. '