Madhya Pradesh Minor Girl Gang Rape: मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. शेळ्यांसाठी चारा आणायला गेलेल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी गावातील तीन तरुणांविरोधात जिग्ना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तिच्या भावापर्यंत पोहोचल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. या घटनेने परिसरत एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास शेळ्यांसाठी चारा आणायला शेतात गेली होती. तिच्यासोबत कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपी जसवंत पाल, नीरज अहिरवार आणि सतेंद्र अहिरवार यांनी पीडिताला अयोग्यरित्या स्पर्श करायला सुरुवात केली. त्यानंतर पीडिताने मदतीसाठी आरडाओरडा केला. परंतु, आरोपींनी तिला मारहाण केली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एवढेच नव्हेतर, आरोपींनी अशा घाणेरड्या कृत्याचा व्हिडिओ बनलला, जो नंतर व्हायरल झाला.
पीडितावर अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडिताला या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या भितीपोटी तिने आपल्या कुटुंबातील कोणालाही सांगितले नाही. मात्र, या घटनेचा व्हिडिओ पीडित मुलीच्या भावापर्यंत पोहोचला आणि धक्कादायक प्रकार उजेडात आला.यानंतर पीडितेने कुटुंबीयांसह पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांत तक्रार दाखल केली.
ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर आरोपी सतेंद्र अहिरवार याला अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपी घटनास्थळावरून फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपी जिल्ह्याबाहेर पळून गेले असून कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पुण्यात दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय, २०) आणि यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय, २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुली बारामती येथील रहिवाशी आहेत. घरी कुणालाही न सांगता त्या शनिवारी (१४ सप्टेंबर २०२४) पुण्यातील हडपसर येथे आल्या, जिथे आरोपींनी त्यांच्यावर अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी मुली शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी एका व्यक्तीच्या फोनवरून त्यांच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर हा प्रकार समोर आला.