pharma factory Blast : आंध्र प्रदेशातील फार्मा फॅक्टरीत भीषण स्फोट, १५ ठार, ४० जखमी-15 killed 40 injured in blast at andhra pradesh pharma factory ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  pharma factory Blast : आंध्र प्रदेशातील फार्मा फॅक्टरीत भीषण स्फोट, १५ ठार, ४० जखमी

pharma factory Blast : आंध्र प्रदेशातील फार्मा फॅक्टरीत भीषण स्फोट, १५ ठार, ४० जखमी

Aug 22, 2024 12:04 AM IST

pharma factory Blast : आंध्र प्रदेशातील एका फार्मास्युटिकल कंपनीच्या प्लांटला लागलेल्या आगीत मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

फार्मा कंपनीत भीषण स्फोट
फार्मा कंपनीत भीषण स्फोट (Video screengrab / PTI)

आंध्र प्रदेशातील एका फार्मास्युटिकल कंपनीच्या प्लांटला लागलेल्या आगीत मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. अनकापल्लीच्या जिल्हाधिकारी विजया कृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अच्युतापुरम विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) असलेल्या एसिएन्टिया अ‍ॅडव्हान्स्ड सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडला बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास आग लागली.

 मृतांचा आकडा १५ वर पोहोचला असून तो वाढण्याची शक्यता आहे. तर जवळपास ४० जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. दीपिका यांनी रॉयटर्सला दिली.

सुरुवातीच्या अहवालात रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले होते, परंतु कृष्णन यांनी ही आग रिअ‍ॅक्टरच्या स्फोटामुळे लागली नसल्याचे स्पष्ट केले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. जखमींना उपचारासाठी अनाकापल्ली आणि अच्युतापुरम येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे... हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे,' अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.  जखमींची प्रकृती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. युनिटमध्ये अडकलेल्या १३ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सात जणांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार उभे राहील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. अधिकारी सध्या स्फोटाच्या कारणांचा शोध घेत असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

इंटरमिजिएट केमिकल्स आणि अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्स (एपीआय) तयार करणाऱ्या सायंटिया अ‍ॅडव्हान्स्ड सायन्सेसने एप्रिल २०१९ मध्ये २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह उत्पादन सुरू केले. आंध्र प्रदेश इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनच्या (एपीआयआयसी) अच्युतापुरम क्लस्टरमधील मल्टी प्रॉडक्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन (एसईझेड) मधील ४० एकर परिसरात हे केंद्र आहे.

सीबीआयच्या रडारवर असलेल्या ईडी अधिकाऱ्याची आत्महत्या -

भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात सीबीआयच्या चौकशीत असलेल्या ईडी अधिकाऱ्याचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला आहे. त्यानं आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीचे अधिकारी आलोक कुमार पंकज यांचा मृतदेह मंगळवारी दिल्लीजवळ साहिबााबादमध्ये रेल्वे रुळावर आढळला.मूळचे गाझियाबादचे रहिवासी असलेले आलोक कुमार नवी दिल्लीत ईडीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. याआधी त्यांनी आयकर विभागात काम केले होते. अलीकडे, कथित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने त्यांची दोनदा चौकशी केली, परंतु पुराव्याअभावी त्यांची सुटका करण्यात आली होती.