कर्नाटकमधील बागलकोटमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेत चोरीच्या संशयातून मुलीचे कपडे काढून तिची झडती घेण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार या मुलीसोबत अन्य चार विद्यार्थ्यांचीही अशाच प्रकारे झडती घेतली होती. या घटनेनंतर मुलीला धक्का बसला व तिने घरी जाऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने आत्महत्या केल्याच्या दोन दिवस आधी बागलकोट शहरातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलीसह चार मुलींची चोरीच्या संशयातून झडती घेतली होती. शाळेतील शिक्षकाचे २ हजार रुपये चोरी झाले होते. त्यानंतर चार मुलींना बोलावले गेले व मुख्याध्यापक व अन्य शिक्षकांच्या समोरच या मुलींचे कपडे काढून त्यांची झडती घेतली गेली. त्यानंतर त्यांना जवळच्या मंदिरात नेऊन शपथ घ्यायला लावली की, त्यांनी चोरी केलेली नाही.
याबाबत बागलकोटचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले की, मृत मुलीची मोठी बहीणही त्याच शाळेत शिकत आहे. तिने आपल्या आई-वडिलांना सर्व घटना सांगितली होती. मात्र त्यांनी याला गांभीर्याने घेतले नाही. पोलिसांनी सांगितले की, मुलीला कपडे काढून झडती घेतल्याच्या घटनेचा धक्का बसला होता. हा धक्का ती सहन करू शकली नाही. तिने दोन दिवसानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, घटनेची चौकशी केली जात आहे. शाळेतील शिक्षक व मुख्याध्यपकांची चौकशी केली जात आहे.