Delhi-Toronto Flight News: दिल्लीहून टोरंटोला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीच्या ईमेलमुळे इंदिरा गांधी विमानतळावरून कॅनडापर्यंत दहशत निर्माण झाली. मात्र, तपासात जे उघड झाले, ते पाहून पोलीसही आश्चर्यचकित झाले. धमकीचा इमेल करणारा अवघ्या १३ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अशा अफवा पसरवण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. अलीकडच्या काळात दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये विमानतळ, शाळा, रुग्णालये इत्यादींमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा करणारे खोटे ईमेल पाठवण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी रात्री ११:२५ वाजता दिल्लीहून टोरंटोला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दिल्ली विमानतळावरील पोलीस सतर्क झाले.पोलिसांनी संबंधित विमानाची चौकशी केली असता काहीही संशयास्पद आढळले नाही. एअर कॅनडा एअरलाइन्सच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र, या मेलनंतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
ज्या ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती, तो इमेल दोन तासांपूर्वीच पाठवण्यात आला होता, असे तपासात समोर आले आहे. धमकीनंतर ईमेल आयडीही डिलीट करण्यात आली. ही ईमेल आयडी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये तयार केल्याचे पोलिसांना समजले. या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला असता अवघ्या १३ वर्षाच्या मुलाने हा मेल केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. चौकशीत त्याने सांगितले की, टीव्हीवर बातमी पाहून त्याला अशी कल्पना सुचली. त्याने मुंबई विमानतळावरील फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती टीव्हीवर पाहिली होती.
धमकीचा मेल केल्यानंतर पोलीस त्याला पकडू शकतील का, हे त्याला पाहायचे होते. त्याने आईच्या फोनचा वाय-फाय वापरून बनावट ईमेल आयडी तयार केला. ईमेल पाठवल्यानंतर त्याने त्याने इमेल आयडी डिलीटही केला. मात्र, या धमकीच्या इमेलनंतर टीव्हीवर बॉम्बची बातमी पाहून तो उत्साहित झाला. याबाबत त्याने कोणालाच काही सांगितले नाही. पोलिसांनी या घटनेत वापरलेले दोन्ही फोन जप्त केले आहेत.