छत्तीसगड राज्यातील बीजापूर जिल्ह्यातील पिडिया परिसरात शुक्रवारी सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांविरोधात मोठे ऑपरेशन राबवले गेले. यामध्ये १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्याचबरोबर या चकमकीत २ जवान जखमी झाले आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी १२ नक्षलवादी मारले गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
याबाबत माहिती देताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी सांगितले की, बीजापूर जिल्ह्यातील गंगालूर परिसरात सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. या कारवाईसाठी जवान व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभिनंदन.
या अभियानात सुकमा,बीजापूर आणि दंतेवाडामधील DRG व कोबरा फोर्सच्या २१० बटालियन व STFच्या जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामुग्री व शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
त्याआधी या चकमकीबाबत माहिती देताना दक्षिण बस्तरचे पोलीस उप महानिरीक्षक कमलोचन कश्यप यांनी म्हटले की, परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. पोलीस दल अजूनही जंगलात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चकमकीत जिल्हा रिझर्व्ह गार्ड (DRG)आणि स्पेशल टास्क फोर्स (STF) ने महत्वाची भूमिका निभावला. सकाळपासून सायंकाळपर्यंत अनेक वेळा नक्षलवादी व जवानांमध्ये चकमक झाली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही चकमक गंगालूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पिडिया गावाजवळ एका जंगलात झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक टीम नक्षलविरोधी अभियानासाठी गेली असताना ही चकमक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुकमा एसपी किरण चव्हाण,बीजापूर एसपी जितेंद्र कुमार यादव आणि दंतेवाडा एसपी गौरव रॉय चकमकस्थळावरील जवानांच्या संपर्कात आहेत.
गेल्या महिन्यातही सुरक्षा दलाने छत्तीसगमध्ये नक्षलवाद्यांविरोधात दोन मोहीमा राबवून अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. कांकेरमध्ये २९ नक्षलवादी ठार केल्यानंतर नारायणपूरमध्ये १० नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले होते. यावर्षी पहिल्या चार महिन्यात सुरक्षा दलाकडून आतापर्यंत एकून ९९ नक्षलवादी मारले गेले आहेत. जे २०२२ व २०२३ मध्ये मारले गेलेल्या २२ व ३० नक्षलवाद्यांच्या एकूण संख्येच्या अधिक आहे.
संबंधित बातम्या