इराणमध्ये अडकलेल्या ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान दिल्लीत दाखल, ऑपरेशन सिंधू अंतर्गत परतले मायदेशी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इराणमध्ये अडकलेल्या ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान दिल्लीत दाखल, ऑपरेशन सिंधू अंतर्गत परतले मायदेशी

इराणमध्ये अडकलेल्या ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान दिल्लीत दाखल, ऑपरेशन सिंधू अंतर्गत परतले मायदेशी

HT Marathi Desk HT Marathi
Published Jun 19, 2025 12:09 PM IST

इराण आणि इस्रायलमधील युद्धानंतर हजारो भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत. त्यांच्या सुखरूप परतीसाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. या अंतर्गत बुधवारी ११० भारतीय विद्यार्थी सुखरूप परतले आहेत.

इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान दिल्लीला पोहोचले
इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान दिल्लीला पोहोचले (HT_PRINT)

Operation Sindhu: इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावानंतर भारताने इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीयांची सुखरूप सुटका केली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान गुरुवारी आर्मेनियातील येरेवान येथून नवी दिल्लीत पोहोचले. तेहरानमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाशी समन्वय साधून सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीने तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना शहरातून बाहेर काढण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

माहितीनुसार भारतीय विद्यार्थी १८ जून रोजी येरेवान येथील झ्वार्टनॉट्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विशेष विमानाने रवाना झाले होते. हे विमान १९ जून रोजी सकाळी नवी दिल्लीत उतरले. यापूर्वी भारताने इराणमध्ये अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ही घोषणा केली आहे. त्यांनी लिहिले की, "भारताने इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. भारत परदेशात असलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो."

भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी इराण आणि आर्मेनियाने केलेल्या मदतीचे ही भारतीय अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने आपली हवाई हद्द बंद केल्याने अडकलेल्या नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या देशांतील डझनभर विमानतळही बंद करण्यात आले आहेत. यानंतर भारताने इराणला नागरिकांच्या परतीसाठी सीमेवर सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.

इराणची विनंती मान्य केल्यानंतर विद्यार्थ्यांना अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तान सारख्या शेजारी देशांमधून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय दूतावासाने इराणमध्ये 24*7 कंट्रोल रूम देखील सुरू केला आहे. इराणमध्ये चार हजारांहून अधिक भारतीय नागरिक राहतात. यातील बहुतांश विद्यार्थी आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर