२२ जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी बनवण्यात आलेली स्पेशल अगरबती गुजरातमधील वडोदरा शहरातून अयोध्याकडे रवाना झाली आहे. १०८ फूट लांब याअगरबत्तीला एका विशेष प्रकारच्या लांब ट्रकमधून नेले जात आहे. या भव्य अगरबत्तीचे वजन जवळपास ३५०० किलो असल्याचे सांगितले जात आहे. विविध प्रकारच्या वस्तुंपासून तयार करण्यात आलेल्या या अगरबत्तीचा उत्पादन खर्च ५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हवन सामुग्री, शुद्ध तूप वगायीच्या शेणापासून ही अगरबत्ती बनवण्यात आली आहे.
वडोदऱ्यातील राम भक्ताने प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त १०८ फुटांची अगरबत्ती तयार केली आहे. या अगरबत्तीचा उत्पादन खर्च पाच लाखाहून अधिक आहे. ही अगरबत्ती तयार करण्यासाठी सहा महिन्याहून अधिक काळ लागला आहे. ही अगरबत्ती वडोदराहून अयोध्येकडे नेण्यासाठी ११० फूट लांब ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे. या अगरबत्तीचे उत्पादनकर्ते विहा भरवाड यांनी सांगितले की, ही अगरबत्ती एकदा पेटवल्यास दीड महिन्यापर्यंत जळत राहते.
२२ जानेवारी रोजी राम मंदिराचे लोकार्पण होणार असून या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्त देशभरात भक्तीमय वातावरण आहे. अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याची आणि राम मंदिरासाठी काहीतरी अर्पण करण्यासाठी अनेकांचा इच्छा आहे.
राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर प्रभू रामाच्या पादुका मंदिरात ठेवल्या जातील. सध्या या पादुका देशभर फिरवल्या जात आहेत. या पादुका प्राण-प्रतिष्ठा महोत्सवाच्या आधी म्हणजे १९ जानेवारी रोजी अयोध्येत पोहोचणार आहेत.