मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गो- रक्षणासाठी दारूच्या प्रत्येक बॉटलवर १० रुपये टॅक्स; भाजप नव्हे काँग्रेस सरकारचा निर्णय
 Himachal Budget 2023
Himachal Budget 2023

गो- रक्षणासाठी दारूच्या प्रत्येक बॉटलवर १० रुपये टॅक्स; भाजप नव्हे काँग्रेस सरकारचा निर्णय

18 March 2023, 14:25 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Himachal Budget 2023:हिमाचल प्रदेशच्या अर्थसंकल्पात गो-रक्षणासाठी दारूच्या प्रत्येक बॉटलवर १० रुपये टॅक्स लावण्यात आला आहे.

Sukhvinder Singh Sukhu: हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी शुक्रवारी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५३ हजार ४१३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये महिलांसाठी पेन्शन, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन आणि जुनी पेन्शन योजना यासंबंधी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. सरकारने गो रक्षणासाठी दारूवर टॅक्स लावण्याचा निर्णयही घेतला आहे. सरकार स्थापनेनंतर सुखविंदर सिंह सुक्खू यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेस सरकारने हिमाचलमध्ये गो-रक्षणासाठी घेतलेल्या आगळ्या वेगळ्या निर्णयाची देशभर चर्चा रंगली आहे. काँग्रेस सरकारच्या घोषणेनुसार, गो-रक्षणासाठी दारुच्या प्रत्येक बॉटलवर १० रुपये टॅक्स आकारला जाणार आहे. यामुळे दरवर्षी सरकारी तिजोरीत १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूलाचा भर पडेल, असाही दावा हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

याशिवाय, सुखविंदर सिंह सुक्खू यांनी प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे आवाहन केले आहे. देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश आदर्श स्थानी असेल. तसेच जलविद्युत आणि सौरऊर्जेला प्रोत्साहन देऊन हिमाचल प्रदेशला येत्या २०१६ पर्यंत हरित राज्य बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. याचबरोबर हिमाचलच्या रस्यावर धावणाऱ्या ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या डिझेलवर चालणाऱ्या बसचे रुपांतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये केले जाईल. यासाठी १००० कोटी खर्च येणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या २० हजार मुलींना इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली. प्रत्येक जिल्ह्यातील किमान दोन पंचायतींचे हरित पंचायतीमध्ये रूपांतर केले जाईल. आपले सरकार जनतेसाठी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यात आली आहे. ज्याचा लाभ १.३६ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. जनतेला दिलेली सर्व आश्वासने आमचे सरकार टप्प्याटप्प्याने पूर्ण करेल, असेही सुखविंदर सुख्कू यांनी म्हटलंय.

विभाग