पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतील पुलांच्या कामांचे कॅगकडून ऑडिट करणार, धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

धनंजय मुंडे

मुंबई महापालिकेने मागील ५ वर्षांत केलेल्या सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट, त्यांची दुरुस्ती, निविदा प्रक्रिया याबाबत कॅगकडून विशेष ऑडिट करणार का, असा तारांकित प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. त्यावर तसे ऑडिट केले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिली.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबतचा प्रश्न बुधवारी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. हा सव्वा कोटी मुंबईकरांच्या जीवाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेत निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले. धड ऑफिसही नसलेल्या डी. डी. देसाई या एकाच कंपनीला मुंबईतील ८२ पुलांच्या ऑडिटचे काम दिले होते. पोलिस अहवालानुसार पुलाच्या खालच्या भागाची तपासणी रस्त्यावर उभं राहून रिपोर्ट दिला गेला. त्यामुळेच ही दुर्घटना घडली असा आरोप मुंडे यांनी केला.

देसाई कंपनीने दिलेला अहवाल तपासण्याची जबाबदारी महापालिका मुख्य अभियंता व उपायुक्तांची होती. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे तसे झाले नाही. त्यांच्यावर काय कारवाई करणार? त्यांना निलंबित करा, अशी मागणी मुंडे यांनी केली.

मुंबईतील रहिवासी प्रत्येक क्षण भीतीच्या वातावरणात जगत आहे. रेल्वे दूर्घटना, पूल दूर्घटना, झाडे कोसळून मुंबईकरांना नाहक जीव गमवावा लागत आहे. एल्फिन्स्टन पुल दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री पियुष गोएल यांनी ४२५ पुलांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्याचे काय झाले? असा सवाल त्यांनी केला. 
याबाबत पुन्हा चौकशी करून दोषी असल्यास महापालिकेच्या उपायुक्तांना निलंबित करू, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.