पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भुजबळांची शिवसेनेत घरवापसी होणार का? तर्कवितर्कांना उधाण

छगन भुजबळ (Photo by Pramod Thakur/ Hindustan Times)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेत दाखल होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर भुजबळांनी १९९१ मध्ये शिवसेनेचा त्याग केला होता. मनीलॉंडरिंगप्रकरणी सुमारे दोन वर्ष कारागृहात राहिलेले भुजबळ शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. 

विशेष म्हणजे याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि स्वतः भुजबळ यांनी भाष्य केलेले नाही. पण भुजबळांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना गैरहजेरी लावल्यापासून त्यांच्या सेना प्रवेशाच्या चर्चेला आणखी वेग आला आहे. महत्वाचे म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील सेनेचे अनेक नेते मुंबईत मातोश्रीवर धाव घेत भुजबळांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला विरोध करत आहेत. उद्धव ठाकरेही असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे या नेत्यांना सांगत आहेत.

अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर; उध्दव ठाकरेंची घेतली भेट

ठाकरे हे अजूनही पर्याय चाचपून पाहत असल्यामुळे त्यांनी यावर अद्याप निर्णय घेतला नसल्याचे जाणकार म्हणतात. गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनीच बाळासाहेब ठाकरे यांना १९९२-९३ च्या मुंबई दंगलीप्रकरणी अटक केली होती, अशी तीव्र भावना सेना नेते आणि कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे त्यांचा भुजबळांना विरोध आहे. आता भुजबळांवर सक्तवसुली संचालनालयाने गुन्हे दाखल केले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी भुजबळांना फोन केला होता. पण भुजबळांनी तो उचलला नाही, अशी माहिती राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. ते नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. पण त्यांनी सुळे यांच्या नाशिक जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली. शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातही ते सहभागी झाले नाहीत. भुजबळ हे माळी समाजातून येतात. राष्ट्रवादीचा ओबीसीचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. 

राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, जर भुजबळांनी पक्ष सोडला तर विधानसभेसाठी 'प्लॅन बी' तयार ठेवला आहे. पक्षाने येवला आणि नांदगाव मतदारसंघासाठी दोन उमेदवारांचे नाव निश्चित केले आहे. नांदगावमधून भुजबळ यांचे पुत्र पंकज हे निवडून आलेले आहेत. बाजीराव शिंदे यांना नांदगावमधून तर माणिक शिंदे यांना येवल्यातून तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी दोन वर्षांहून अधिक काळ कारागृहात असताना पक्षाच्या नेत्यांनी साथ न दिल्यामुळे भुजबळ हे नाराज असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही मतदारसंघातील परिस्थिती त्यांच्यासाठी कठीण आहे. भाजपत जाण्याचाही त्यांचा पर्याय संपुष्टात आला आहे. भाजपने त्यांच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत. त्याचबरोबर तीव्र विरोधामुळे त्यांचा सेना प्रवेशही सुरळीत होणार नसल्याचे दिसत आहे, असे भुजबळांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले.

कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही: संजय दत्त

नाशिकचे सेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनीही भुजबळांना विरोध केला आहे. सेनेच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुजबळ यांनी तीन जागांची मागणी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर ही जागा पुतण्या आणि माजी खासदार समीरसाठी तर उर्वरित जागा या स्वतःसाठी आणि पुत्र पंकजसाठी मागितल्या आहेत.

भुजबळांना याबाबत संपर्क साधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. पण ते उपलब्ध होऊ शकले नाही. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या अफवा असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी भुजबळांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारले असता योग्यवेळी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे म्हटले आहे.

सर्जिकल स्ट्राईकमुळे देशातील बेरोजगारी हटणार नाही, संजय राऊत यांचा टोला