पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरे म्हणतात, मला स्वतःहून युती तोडायची नाही पण...

उद्धव ठाकरे (PTI file photo)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या आमदारांची बैठक 'मातोश्री' निवासस्थानी बोलावली होती. यावेळी त्यांच्याशी संवादात त्यांनी मला स्वतःहून युती तोडायची इच्छा नाही. पण भाजपने युती करण्याआधी जे निश्चित केले होते. त्याप्रमाणे त्यांनी करावे, एवढीच माझी अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आमदारांना सांगितल्याची माहिती मिळाली आहे. काही वृत्तवाहिन्यांनी या संदर्भातील बातमी प्रसारित केली आहे. 

ज्यांच्या जास्त जागा त्यांचाच मुख्यमंत्री - नितीन गडकरी

दोन आठवड्यानंतरही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. जनतेने शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने कौल दिलेला असला, तर सत्तावाटपावरून या दोन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. मुख्यमंत्रीपदासह सर्व मंत्रिपदांचे समसमान वाटप केले जाण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. युती करण्यापू्र्वी आमच्यात तसेच ठरले होते, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. तर भाजप मुख्यमंत्रीपद सोडण्यास अजिबात तयार नाही. इतर मंत्रिपदांबाबत चर्चा होऊ शकते, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी संपुष्टात येत आहे. त्यामुळे त्यापूर्वी नवे सरकार सत्तेत येणे आवश्यक आहे. पण आता उद्धव ठाकरे यांच्या या विधानाने हा तिढा लवकर सुटेल का, पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत येईल का, या सर्व मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्रीपदावर दावा सांगण्यास सुरुवात केली. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे आणि पहिली अडीच वर्षे आम्हाला मुख्यमंत्रीपद देण्यात यावे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. शिवसेना नेते संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून रोज सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपवर दबाव निर्माण कऱण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करावा, असेही संजय राऊत सांगत आहेत.  

अल्पमतातील नाही तर स्थिर सरकार देऊ - सुधीर मुनगंटीवार

संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील भेटींवरूनही विविध राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे काँग्रेस आमदारांचा एक गटही शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे, या मताचा आहे. त्यासाठी शिवसेनेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देण्यासही काँग्रेसचा हा गट तयार आहे.