कोणत्याही नवीन नेत्याला पक्षात घेताना सगळ्या बाजूंनी विचार केला जातो. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतो, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी गुरुवारी 'मातोश्री'वर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेनेचे वरळी विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि इतर नेते यावेळी मातोश्रीवर उपस्थित होते.
राष्ट्रवादीला पुन्हा मोठा धक्का, सचिन अहिर शिवसेनेत
उद्धव ठाकरे म्हणाले, राजकारण हे राजकारणासारखेच करायचे असते. पण काही गोष्टींचे तारतम्य बाळगायचे असते. नुसते पक्ष फोडण्याचे काम आम्ही कधीच केले नाही. आम्हाला फोडलेली माणसे नकोत. मनाने जिंकलेली माणसे हवी आहेत. सगळा विचार करूनच आम्ही नवीन नेत्यांना पक्षात घेत असतो. आम्हाला पक्षाची ताकद अशीच वाढवत न्यायची आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम उद्धवजींनी केले असल्याचे सांगून सचिन अहिर म्हणाले, आम्ही इतके दिवस एकमेकांच्या विरोधात असलो तर राज्याची संस्कृती जपण्याचे काम आम्ही केले आहे. शरद पवार हे कायम माझ्या ह्रदयात राहतील. पण आता शरीरात शिवसैनिकाचे बळ आले आहे. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस तोडणार नाही, पण शिवसेना वाढविण्याचे काम नक्कीच करणार, असेही त्यांनी सांगितले.
राजीव गांधी हत्येतील दोषी नलिनी हिची पॅरोलवर महिन्यासाठी सुटका
सचिन अहिर जरी वेगळ्या पक्षात असले, तरी माझे त्यांच्याशी बोलणे व्हायचे. त्यातून मला असे जाणवले की आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो, तरी आमची स्वप्ने एकच आहेत. त्यातूनच महाराष्ट्रात काम करायचे असेल, तर शिवसेना योग्य असल्याचे सचिन अहिर यांना जाणवले. मग मी त्यांची आणि उद्धवजींची भेट घडवून आणली. त्यावेळीच त्यांचे शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित झाले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.