पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विखेंचे कॅबिनेट मंत्रिपद जवळपास निश्चित, खाते कोणते यावरून वाटाघाटी सुरू

राधाकृष्ण विखे पाटील

काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. खुद्द विखे पाटील यांनीच ही माहिती माध्यमांना दिली. गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण लोकसभा निवडणुकीनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. विखे-पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे अन्य दोन आमदारही भाजपमध्ये दाखल होणार आहेत. विधानसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. 

विधानसभेसाठी मनसेला सोबत घेण्यावरून विरोधकांमध्ये अद्याप एकमत नाही

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची विखे-पाटील यांनी मंगळवारी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. पण अधिक माहिती देण्यास नकार दिला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून माझा मुलगा सुजय याच्या विजयाबद्दल आभार मानण्यासाठी मी गिरीश महाजन यांची भेट घेतली, असे त्यांनी माध्यमांना सांगितले. मार्च महिन्यात सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली आणि विजय मिळवला. तेव्हापासून राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसपासून चार हात लांब आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या महिन्यात त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. 

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विखे पाटील यांना राज्यात कॅबिनेट मंत्रिपद दिले जाणार आहे. खाते कोणते यावरून सध्या वाटाघाटी सुरू आहेत. महत्त्वाचे खाते मिळवण्यासाठी विखे-पाटील प्रयत्नशील आहेत.

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसकडून जाण्याची शक्यता

पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, आम्ही विखे-पाटील यांच्या संपर्कात आहोत. कोणत्या दिवशी पक्षप्रवेश करायचा हे तेच ठरवतील. जूनच्या पहिल्या आठवड्यात हा पक्षप्रवेश होऊ शकतो. काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.