कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाईलाजानं मुंबईकरांची 'लाइफ लाइन' म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे या महिन्याअखेरपर्यंत आपल्या लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवणार आहे. वारंवार सांगूनही लोकलमधली गर्दी कमी होत नसल्यानं नाईलाजानं हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
३१ मार्च पर्यंत रेल्वेसेवा बंद, देशाची वाटचाल लॉक डाऊनच्या दिशेने
मुंबई लोकलनं दरदिवशी लाखो मुंबईकर प्रवास करतात. कामानिमित्तानं उपनगरातून लाखो प्रवासी या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या तिन्ही मार्गावरून प्रवास करतात. मुंबई लोकलला मोठी गर्दी असते आणि या गर्दीमधून कोरोना विषाणू पसरण्याची शक्यता मोठी आहे.
ICMR कडून खासगी लॅब Covid-19 टेस्टची दर निश्चि
गेल्या आठवडाभरापासून लोकलनं प्रवास न करण्याचं, गर्दी न करण्याचं आवाहन करुनही मुंबई लोकलमधली गर्दी कमी झालेली नाही. गेल्या आठवड्यात होम क्वारंटाइनचा शिक्का असलेले अनेक प्रवाशी लोकलनं प्रवास करताना आढळून आले आहेत. परदेशातून परतलेले आणि ज्यांच्यामुळे कोरोना पसरण्याची शक्यता अधिक आहे अशा प्रत्येक व्यक्तीला १४ दिवसांसाठी घरी किंवा विलगीकरण कक्षात राहणं बंधनकारक आहे तरी देखील अनेकजण इतराचं आयुष्य धोक्यात घालत आहेत. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.
मुंबई लोकल ही केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सुरु ठेवावी असा निर्णय शनिवारी झाला होता. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींचे ओळखपत्र तपासून मगच त्यांना प्रवेश देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं, त्यानंतर अनेकांचं ओळखपत्र तपासूनच त्यांना स्थानकावर सोडण्यात येत होतं. मात्र कोरोनाचा वाढता धोका पाहता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रविवार दुपारपर्यंत राज्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही ७४ वर पोहोचली होती.