पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधान परिषदेवर जाण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे संकेत

उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभेवर निवडून जाणार की विधान परिषदेचा मार्ग अवलंबणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधान परिषदेवर जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. ते राज्यसभा सदस्य तथा 'सामना'चे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. येत्या दोन-चार महिन्यांत मला विधिमंडळावर जाण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. विधानसभेवर जायचं म्हणजे जो निवडून आला असेल त्याला राजीनामा द्यायला लावून परत निवडणुका घ्याव्या लागतील. विधान परिषदेपेक्षा माझे मत असे आहे की, ही जबाबदारी आली ती पार पाडण्यासाठी जर विधानसभेतून कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन तर का नाही जायचं? मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून हे सगळं बोलायला ठीक आहे. मग मी तर म्हणेन, मी छपरातून आलो आहे, असे ते म्हणाले. 

...तर आज मी मुख्यमंत्री नसतोः उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री होण्याआधी मी त्या विधान भवनात आयुष्यात दोन-चार वेळेहून अधिक गेलो नसेन. असं देशात अपवादात्मक परिस्थितीत झालं असेल की, एखादी व्यक्ती जी तिकडे येण्याचं कधी स्वप्न नव्हतं ती व्यक्ती येते तेच मुख्यमंत्री म्हणून. मी नेहमी सांगतो, जबाबदारीतून मी कधी पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. त्यामुळे कुणालाही न दुखावता जे शक्य असेल ते मी करेन.

आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि राहणारचः CM ठाकरे

सत्तेसाठी वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्याची टीका भाजपकडून केली जाते. यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, करूद्या त्यांना टीका. पण मग माझा प्रश्न असा आहे, पक्ष फोडून आणलेली माणसं तुम्हाला चालतात. मग त्या पक्षासोबतच हात मिळवला तर काय फरक पडतो? त्या पक्षातले मोठमोठे नेते घेऊन भारतीय जनता पक्षातसुद्धा त्यांना सामावून घेतलंच आहे ना. कित्येक नेते काँग्रेसमधून त्यांनी घेतलेत. त्यांना आमदारक्या, खासदारक्या किंवा इतर काही गोष्टीसुद्धा दिल्या आहेत. तेसुद्धा त्या विचारधारेवरच होते ना?