दिवाळी सुरू झालेली असली तरी मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक शनिवारी दुपारी मातोश्रीवर झाली. या बैठकीत सत्तास्थापन कऱण्याचे आणि त्यासाठी भाजपशी वाटाघाटी करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याचा निर्णय आमदारांनी एकमताने घेतला. सुमारे सव्वातास मातोश्रीवर ही बैठक चालली.
आम्ही विरोधकच राहणार, प्रफुल्ल पटेलांनी वेगळी समीकरणे फेटाळली
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे महत्त्व वाढले आहे. शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी आणि सरकार चालविण्यासाठी पुढे जाऊ शकत नाही, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. भाजपला १०५ जागा मिळाल्या असून, शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांच्यात दिवाळीनंतर चर्चा होणार आहे. या चर्चेतच सत्तेचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल. चर्चेमध्ये शिवसेना आपल्या पदरात सत्तेतील कोणती पदे घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजप-शिवसेनेतील चर्चेमध्ये आदित्य ठाकरेंना महत्त्वाचे स्थान
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने समसमान जागावाटप आणि सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला होता. त्या प्रमाणेच आता शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले जावे, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे भाजपच्या नेत्यांशी बोलतील आणि तेच पुढील निर्णय घेतील, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांना सांगितले. भाजपकडून लेखी स्वरुपात फॉर्म्युला आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.