पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपपेक्षा शिवसैनिकांना मोदींचा जास्त आदर, म्हणूनच त्यावेळी बोललो नाही - संजय राऊत

संजय राऊत (ANI)

भाजपपेक्षा शिवसैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जास्त आदर आहे. त्यामुळेच आम्हाला नरेंद्र मोदी यांना खोटे पाडायचे नव्हते. आम्ही प्रचारावेळीच नरेंद्र मोदी यांच्या त्या वक्तव्याला विरोध केला असता तर त्यांचा अपमान झाला असता. म्हणूनच आम्ही त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा मांडला नाही, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी राज्यातील सत्तापेचावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर पहिल्यांदाच भाष्य केले. त्यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे प्रत्युत्तर दिले.

राम मंदिरासाठी सरकारकडून हिवाळी अधिवेशनातच विधेयक मांडण्याची तयारी

प्रचारावेळी मी आणि नरेंद्र मोदी सर्व सभांमध्ये जर युतीचे सरकार आले तर देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे सांगत होतो. मग त्यावेळी शिवसेनेने त्याला आक्षेप का घेतला नाही, असा मुद्दा अमित शहा यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोटे पाडायचे नव्हते. आम्ही जर त्यावेळी बोललो असतो, तर पंतप्रधानांचा अपमान झाला असता. सामान्य शिवसैनिकांनी नरेंद्र मोदींचा भाजपपेक्षा जास्त आदर केला आहे. त्यामुळेच त्यावेळी आम्ही हा मुद्दा उपस्थित केला नव्हता.

त्या दोन घटनांमुळे राष्ट्रवादीच्या हेतूंबद्दल काँग्रेस साशंक

बंद खोलीत काय चर्चा झाली हे उघड करणे योग्य नसल्याचे अमित शहा यांनी म्हटले होते. त्यालाही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मातोश्रीवरील शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची ती खोली आहे. याच खोलीतून त्यांनी नरेंद्र मोदींना आशीर्वाद दिला होता. या खोलीतच उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा झाली. आजही देशात कोणी मोठी व्यक्ती आली, तर त्यांना त्या खोलीत जाऊन नमन कऱण्याची इच्छा असते. आमच्यासाठी ती खोली नाही तर मंदिर आहे. मंदिरात दिलेला शब्द पाळला गेलाच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. बंद खोलीत दिलेला शब्द तुम्ही पाळला नाही म्हणूनच तो आम्हाला बाहेर आणावा लागला, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shivsena leader sanjay raut reacted to bjp amit shah comment on chief minister position of maharashtra