पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेची मोदींवर स्तुतीसुमने तर काँग्रेसला फटकारले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अझहर प्रकरणावरुन मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. याचवेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. मोदी यांनी आधी बालाकोटवर एअर स्ट्राइक केले व आता युनोकडून मसूदची घेराबंदी केली. त्याबद्दल कश्मीरातील फुटीरतावाद्यांना अश्रू आवरणे कठीण झाले हे मान्य, पण महान परंपरा वगैरे असलेल्या काँग्रेसलाही हुंदके फुटावेत याचा काय अर्थ घ्यावा? मोदी हे देशाला लाभलेले खंबीर नेतृत्व आहे असे लोकांना वाटते ते यामुळेच, असे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' लिहिलेल्या अग्रलेखात त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

काय म्हटलंय शिवसेनेने..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने कमाल केली आहे. त्यांनी आधी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले व आता पाकडय़ांना मदत करणाऱया चीनची भिंत तोडली आहे. मोदी है तो मुमकीन है. त्यांना काहीच अशक्य नाही हे मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित करायला लावून मोदींनी सिद्ध केले आहे. मसूद अझर हा भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. मुंबईतील ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्याचाही तोच सूत्रधार आहे. भारताचे तुकडे तुकडे करण्याचे त्याचे स्वप्न आहे व त्यासाठी त्याने अनेक कारस्थाने अमलात आणली. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्यात याचा समावेष होता. या हल्ल्याची जबाबदारी मसूदने घेतली तरीही काँग्रेसचे पुढारी व मोदी विरोधकांचा आरोप असा की, पुलवामाचे हत्याकांड लोकसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून घडवून आणले गेले. याप्रकरणी त्यांनी थेट पंतप्रधानांवरही फालतू आरोप केले. हा सर्व प्रकार गलिच्छ राजकारणाचा आहे. मसूद हा जणू मोदी विरोधकांचा जावई आहे व या जावयास जागतिक दहशतवादी घोषित करून काय मिळवले? असा प्रश्न काँग्रेसने विचारावा हे देशाचे दुर्दैव आहे. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचे ‘टायमिंग’ योग्य आहे काय? अशी शंका उपस्थित केली. येथे टायमिंगचा प्रश्न येतोच कोठे? देशात निवडणुका सुरू आहेत व या घटनांचा फायदा मोदी यांना मिळेल अशी भीती त्यांना वाटत असावी. आता हेच ‘टायमिंग’ का? हा प्रश्न कमलनाथ यांनी ‘युनो’त जाऊन विचारायला हवा. दहशतवाद्यांशी लढताना भावना आणि टायमिंगचा विचार करायचा नसतो. मैदानावर आणि कागदांवर थेट हल्ला करायचा असतो. ‘अभी तो शुरूआत है, आगे आगे देखिए क्या होता है?’ मोदी काय करतात ते पाहायला हवे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shiv sena uddhav thackeray praises pm narendra modi on masood azhar and slams on congress