पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्रीलंकेत बुरखा बंदी मग भारतात कधी, शिवसेनेचा मोदींना सवाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवसेनेनेही भारतात बुरखा किंवा नकाबवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार, असा सवाल त्यांनी केला आहे.

'सामना' या मुखपत्रातून शिवसेनेने ही मागणी केली आहे. लिट्टेच्या दहशतवादातून मुक्त झालेला श्रीलंका आता इस्लामी दहशतवादाचा बळी ठरला आहे. भारताचा जम्मू आणि कश्मीर याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त झाला आहे. श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार? भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत व पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातही राष्ट्रहितासाठी ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी करत असल्याचे सेनेने म्हटले आहे.

काय म्हटलंय शिवसेनेने..

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला होताच तेथील सरकारने बुरखा बंदी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबत भारत मागे का? एक तर असंख्य मुस्लिम तरुणींना बुरखा झुगारायचा आहेच व दुसरे म्हणजे बुरख्याआडून नेमके काय सुरू असते याचा अंदाज येत नाही.

बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, दहशतवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर आली. तुर्कस्तान हे इस्लाम मानणारे राष्ट्र, पण केमाल पाशाला बुरख्याआड काही घडत असल्याचा संशय येताच त्याने त्याच्या देशात मुसलमानी तरुणांची दाढी व बुरख्यांवर बंदी आणलीच होती. मुळात बुरख्याचा इस्लामशी काडीमात्र संबंध नाही व हिंदुस्थानातील मुसलमान अरबस्तानातील समाजव्यवस्थेचे अनुकरण करीत आहेत. 

ट्रिपल तलाक आणि बुरखा बंदीविरोधात कोणी आवाज उठवला तर इस्लाम संकटात आल्याची बांग मारली जाते. खरे म्हणजे मुसलमानांना त्यांचाच धर्म नीट समजलेला नाही असाच त्याचा अर्थ. (अर्थात काही हिंदूंच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल.) ‘राष्ट्र नंतर, आधी धर्म’ हा मुसलमान समाजाचा प्राधान्यक्रम आहे. पुन्हा हा धर्मदेखील फालतू रूढी-परंपरांच्या बेड्यात अडकलेला आहे. मुसलमानांत कोणी फुले, शाहू निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत. त्यामुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू व अबू आझमी या धर्मांध माथेफिरू नेत्यांचे फावले. ही धर्मांधता व त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. मोदी यांनी हे सर्व करून घेतले पाहिजे. सर्जिकल स्ट्राइकइतकेच हे कार्य धाडसाचे आहे. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार, असा सवाल शिवसेनेने केला आहे.