पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढू, उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

उद्धव ठाकरे

राम मंदिर आम्हाला मतांसाठी नकोय. आम्ही वचनाला जपतो. 'प्राण जाये पर वचन न जाये' ही शिवसेनेची नीती आहे. आमचा कारभआर प्रभू रामचंद्रांसारखा असेल. त्यामुळे विशेष कायदा करा आणि राम मंदिर बांधा ही आमची मागणी आजही कायम आहे, अशी आग्रही मागणी करत राम मंदिर बांधायचे आणि वचने तोडायची हे आमचे काम नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला लगावला. राम मंदिराचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर भाष्य करु नका असे पंतप्रधान म्हणाले. युती झाली असल्यामुळे जरा जपून बोलावे लागते. रामाच्या जन्मावेळी न्यायालयाला सुटी असते पण तेच न्यायालय रामाचा पुरावा मागतो, हे दुर्देव असल्याचेही ते म्हणाले. प्रेमाने अलिंगन दिल्यानंतर पाठीत खंजीर खुपसला जात असेल, तर शिवसेना ते सहन करणार नाही. वाघ नखांनी गुदगुदल्या होत नाहीत. पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिला. आपल्या ३५ मिनिटांच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी आरे वृक्षतोडीचा उल्लेख टाळला. 

...तर पवाराची औलाद सांगणार नाही: अजित पवार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. ठाकरे यांनी आपल्या भाषणात युती, राम मंदिर, बंडखोरी आणि जाहीरनाम्यातील काही प्रमुख मुद्द्यांचा उल्लेख केला. 

हिंदुत्त्वासाठी युती
यावेळी युतीवरुन उद्धव यांनी भाजपला टोला लगावला. ते म्हणाले, शिवसेनेच्या पाठीवर वार करण्याचे काम करु नका. शिवरायांचा महाराष्ट्र कुणाची लाचारी करणारा नाही. लपून-छपून करणारी शिवसेनेची औलाद नाही. महाराष्ट्राती युती ही प्रामाणिक आहे. भारत भगवामय करण्यासाठी युती केली आहे. शिवसेना कुणासमोर वाकत नाही, झुकत नाही. शिवसेना फक्त शिवरायांसमोर झुकते. एकतर मरेन नाहीतर मारेन, अशी शिवसैनिकांचे धोरण आहे. आमची युती ही हिंदुत्त्वासाठी आहे. 

आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी तयार राहा
काँग्रेस-राष्ट्रवादी थकल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. त्याचाही समाचार उद्धव यांनी घेतला. तुम्ही वयामुळे नव्हे तर भ्रष्टाचार केल्यामुळे थकले आहात, अशी टीका त्यांनी केली. तुम्ही सत्ताकाळात काय-काय खाल्ले असे म्हणत तुमचा नेता ठरवा नाहीतर पुन्हा-पुन्हा भांडाल, असे म्हणत आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी तयार राहा, असेही ते म्हणाले. 

कर्मामुळेच अजित पवारांच्या डोळ्यात पाणी
अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. राजकारणाचा स्तर घसरला असून आपण शेती करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तुमच्या कर्मामुळे तुमच्या डोळ्यात पाणी आले आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या धरणाविषयीच्या वक्तव्याची आठवण करुन दिली. 

'शरद पवारांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार'

१० रुपयांमध्ये अन्न थाळी, १ रुपयांत आरोग्य चाचणी
महायुतीचा जाहीरनामा अजून प्रसिद्ध झाला नसला तरी उद्धव ठाकरेंनी काही ठळक मुद्द्यांचा आपल्या भाषणात उल्लेख केला. मला शेतकऱ्यांची कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी आहे. पुन्हा सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करणार आहे. १० रुपयांमध्ये अन्न थाळी, सुदृढ महाराष्ट्रासाठी एक रुपयांत आरोग्य चाचणी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बसची सोय आणि संपूर्ण महाराष्ट्रात ३०० यूनिटच्या दरावर सवलत दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

तिकीट कापलेल्यांची मागितली माफी
उद्धव ठाकरे यांनी यावेळी तिकीट कापलेल्यांची माफी मागितली. ही युती महाराष्ट्राच्या विकासासाठी केली आहे. ज्यांची तिकिटे कापली गेली त्यांची मी माफी मागतो. जागा न मिळालेल्यांचीही माफी मागतो. जागा कमी मिळाल्या तरी चालतील पण ताकद कमी पडली नाही पाहिजे, असे म्हणत त्यांनी बंडखोरी शमवण्याचे प्रयत्न केले.
त्याचबरोबर डोक्यात सत्ता जावू देऊ नका. डोक्यात सत्ता घुसली तर रस्त्यावरचं कुत्रंही विचारणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.