जे करायचं ते दिलखुलासपणे करायचं. आम्हाला सत्तेची हाव नाही पण सत्ता हवी आहे. ही सत्ता राज्याचा विकास करण्यासाठी हवी. हे एक चांगलं आणि मजबूत सरकार, असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई मेट्रो विस्ताराची पायाभरणी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा मला अभिमान आहे. कोणकोणत्या गोष्टींबद्दल मी त्यांचे अभिनंदन करु, असा सवाल मी पंतप्रधान मोदींना केला. सरकार सत्तेवर आल्यापासून अवघ्या २ ते ३ महिन्यांत त्यांनी कामांचा धडाका लावला आहे. विश्वास बसत नव्हता, त्या गोष्टी होत आहेत. कलम ३७० रद्द केले, चंद्रालाही गवसणी घातली आहे. आता हे सरकार अयोध्येत राम मंदिर उभारल्याशिवाय राहणार नाही, समान नागरी कायदा लागू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींने देशाला दिशा दाखवण्याचे समर्थ नेतृत्व दिले. देशाकडे असलेल्या ताकदीचा वापर करण्याचा नेता मला लाभलेला आहे, असे गौरवोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. नागरिकांना ज्या सुविधा मिळत नव्हत्या. त्या सुविधाही आम्ही देत आहोत. युती आहे, करायंच ते दिलखुलास करायचं, असे ते म्हणाले. आम्ही मित्रपक्षाचं चांगलं सरकार पुढे नेत आहोत, असे म्हणत महराष्ट्रात युतीचं सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.