पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निधी चौधरींचे कृत्य केवळ लांछनास्पद नव्हे तर कारवाईस पात्र, पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

निधा चौधरी, शरद पवार

मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या टि्वटनंतर सुरु झालेला वाद शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चौधरी यांचे निलंबन करण्याची मागणी केली होती. आता यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शरद पवार यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकार्‍याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे केवळ लांछनास्पद नसून कारवाईस पात्र आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून या अधिकार्‍यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

मुंबईः पालिका उपायुक्त निधी चौधरींचे महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त टि्वट, राष्ट्रवादीची निलंबनाची मागणी

आपल्या वादग्रस्त टि्वटमध्ये निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येच्या तारखेचा उल्लेख करताना मारेकरी नथुराम गोडसे यांचे आभार मानले होते. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते की, 'आपण महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी करत आहोत. देशातील चलनावरुन त्यांचे छायाचित्र हटवण्याची हीच योग्य वेळ आहे. जगभरातील त्यांचे पुतळे हटवायला पाहिजेत. संस्थांची नावे बदलली पाहिजेत. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. ३० जानेवारी १९४८ साठी थँक्यू गोडसे!' चौधरी यांच्या या टि्वटनंतर सोशल मीडियावर वाद सुरु झाला होता. त्यानंतर त्यांनी हे टि्वट डिलिट केले होते.

'IAS महिला अधिकाऱ्याच्या 'त्या' ट्विटवर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी'

शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'बृहन्मुंबई महानगरपालिकेवर उपायुक्तपदी कार्यरत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्ताने भारतीय चलनातील नोटांवरील या महामानवाचे चित्र काढून टाकावे व जगातील त्यांचे पुतळे हटवून त्यांना श्रद्धांजली देण्यात यावी असे धक्कादायक विधान सोशल मीडियावर केल्याचे समजते. या विधानात महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरणही करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शासकीय अधिकार्‍याकडून असा प्रमाद घडावा व शासनाने त्याकडे काणाडोळा करावा हे अशोभनीय आहे. शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकार्‍याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे केवळ लांछनास्पद नसून कारवाईस पात्र आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून या अधिकार्‍यावर कडक कारवाई करावी.'
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sharad Pawar has written to CM Fadnavis demanding exemplary action against IAS officer Nidhi Choudhary for her tweet on Mahatma Gandhi