मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शुक्रवारी रात्री आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. पण याचे गंभीर पडसाद या संपूर्ण परिसरात उमटले. अनेक पर्यावरणप्रेमी आंदोलकांनी या कामाला तीव्र विरोध केला आणि घटनास्थळी आंदोलन केले. पोलिसांनी २९ आंदोलकांना अटक केली आहे. यापैकी २३ पुरुष असून सहा महिला आहेत. त्याचबरोबर या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. आरे कॉलनीच्या भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांचे प्रवक्ते उपायुक्त प्रणय अशोक म्हणाले, आम्ही आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३३२, ३५३, १४३ आणि १४९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरे कॉलनीत मध्यरात्री राडा, झाडे तोडण्यावरून आंदोलक संतप्त
आरे कॉलनीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेस्टने या मार्गावरील बससेवा स्थगित केली आहे. या मार्गावरील सर्व बस या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडने वळविण्यात आल्या आहेत.
मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील २६४६ झाडे तोडण्यात येणार आहेत. त्याला पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. राजकीय पक्षांनीही वृक्षतोडीला विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, केवळ सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिल्यास अडचण होऊ नये म्हणून एका रात्रीत झाडे तोडण्यात आल्याचे म्हटले आहे.
आदित्यच्या उमेदवारीनंतर उद्धव ठाकरे यांनी मांडली महत्त्वाची भूमिका
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याचे कृत्य भ्याडपणाचे असल्याचे म्हटले आहे. या कृतीचा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून तीव्र निषेध केला आहे.
Mumbai: Entry into #Aarey from Marol Maroshi Road restricted after Section 144 has been imposed in the area. #AareyForest pic.twitter.com/4sAaqbjLOX
— ANI (@ANI) October 5, 2019