मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड झाली आहे. अमित ठाकरे हे देखील आता राजकारणात सक्रीय झाले आहेत. मनसेच्या अधिवेशनामध्ये अमित ठाकरे यांचे लाँचिंग करण्यात आले. या अधिवेशना दरम्यान अमित ठाकरे यांनी शिक्षणाचा ठराव सर्वांसमोर मांडला. यावेळी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्यावतीने अमित ठाकरे यांचा शाल, तलवार देऊन सत्कार करण्यात आला.
'फक्त कर्जमाफी नकोय, राज्यातील शेतकरी भिकारी नाहीत'
अधिवेशनात बोलताना अमित ठाकरे यांनी सांगितले की, २७ वर्षांत पहिल्यांदाच व्यासपीठावर बोलतोय. त्यामुळे हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. अमित ठाकरे यांनी यावेळी राज ठाकरे यांचे आभार मानले. मनसेचा ठराव मांडणार हे काल मला संध्याकाळी सांगितलं. त्यावेळी पायाखालची जमीन सरकणं काय असते याचा अनुभव मला आला, असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.
मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
अमित ठाकरे राजकारणात सक्रीय झाले. अमित ठाकरे यांचे लाँचिंग झाल्यानंतर अंगावर काठा आला. या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कामं खूप करण्यासारखी आहे. त्यामुळे कुणाशीही तुलना न करता काम करणे महत्वाचे आहे. अमित ठाकरे यांना आमच्या शुभेच्छा कायम असणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान १० वर्षापूर्वी आदित्य ठाकरे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत लाँचिंग झाले होते.