पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींना जामीन मंजूर, विचारांची लढाई सुरूच ठेवणार

राहुल गांधी शिवडी न्यायालयात

लेखिका-पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात संघाच्या कार्यकर्त्याकडून अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. याच याचिकेवरील सुनवाणीसाठी राहुल गांधी गुरुवारी सकाळी मुंबईतील शिवडी येथील न्यायालयात दाखल झाले होते. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असून, १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. 

या प्रकरणी आपण दोषी नसल्याचे राहुल गांधी यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनुसार राहुल गांधी यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यासाठी जामीन दिला. एएनआयने हे वृत्त दिले आहे. 

आपली विचारांची लढाई आहे आणि ती यापुढील काळातही आणखी जोमाने सुरूच राहिल, असे राहुल गांधी यांनी न्यायालयातून बाहेर आल्यावर सांगितले. देशातील गरीब, शेतकरी, मजूर यांच्यासाठी मी लढत राहिन, असे त्यांनी म्हटले आहे. 

गुरुवारी सकाळीच राहुल गांधी यांचे विमानाने मुंबईला आगमन झाले. त्यानंतर लगेचच ते न्यायालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, आमदार नसीम खान, भाई जगताप, मिलिंद देवरा आणि अन्य नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल बुधवारीच माहिती दिली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून आतापर्यंत केलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहे. काँग्रेस कार्यकारिणीने लवकर नवीन अध्यक्ष निवडावा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधी यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर शिवडी न्यायालयाबाहेर गुरुवारी सकाळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी घोषणाही देण्यात आल्या. राजीनामा मागे घेण्याची विनंती कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. 

याच प्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्याविरोधातही अवमान याचिका दाखल करण्यात आली असल्यामुळे ते सुद्धा गुरुवारी न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले होते..