पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जे औरंगजेबाला जमलं नाही ते सरकारनं करून दाखवलं: अमोल कोल्हे

अमोल कोल्हे

राज्यातील ऐतिहासिक गडकिल्ले लग्न समारंभ आणि हॉटेलिंगसाठी भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा जोरदार विरोध होत आहे. राज्य सरकारने घेतला हा निर्णय वादात सापडला आहे. या निर्णयामुळे गडप्रेमी दुखावले आहेत. त्याचसोबत विरोधक देखील आक्रमक झाले आहे. विरोधकांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे.

'महाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. त्यांचं रिसॉर्ट आणि हेरीटेज हॉटेल्समध्ये रुपांतर करण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही ठामपणे विरोध करतो. राज्यातील किल्ल्यांचे जागतिक मानकांनुसार संवर्धन होणे गरजेचे आहे.' असे ट्विट करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध करत सडकून टीका केली आहे. 'जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं, असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. '२०१४ मध्ये मागितला छत्रपतींचा आशीर्वाद आणि २०१९ मध्ये केलं औरंगजेबाचं काम' असे त्यांनी म्हटले आहे. 'ज्या असंख्य मावळ्यांनी हे गडकोट राखण्यासाठी बलिदान दिलं त्यांचा हा अपमान आहे. गडकिल्ल्यावर लग्नसमारंभ कोणाला परवडणार आणि ज्यांना परवडणार त्यांना "आपल्या" इतिहासाची कितपत जाण आणि भान असणार?', असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे.

'सरकारने गडकिल्ल्यांबाबत घेतलेला निर्णय हा तुघलकी निर्णय आहे. हा मराठी मातीचा, अस्मितेचा अपमान आहे. गडकील्ले हे कुणाच्या बापाची जहागिर नाही', असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. तसंच, गडकिल्ले आमचा ऊर्जा स्रोत आहे. हा इतिहास आमच्या मराठी मातीचा, आमच्या स्वाभिमानाचा, आमच्या अस्मितेचा इतिहास आहे. या इतिहासासोबत आम्ही खेळून देणार नाही. लग्नासाठी, समारंभासाठी पार्ट्यांसाठी आमचे गडकिल्ले आम्ही वापरुन देणार नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.