पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'रयतेच्या राज्यासाठी फक्त शिवाजी महाराजांच्या घराण्यात जन्माची गरज नाही'

संजय राऊत

रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व नेते झटलेले आहेत. यामध्ये शरद पवार यांनीही परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात जन्म घेण्याची गरज नाही, अशी भूमिका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मांडली. त्याचवेळी त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांना, आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा आदर राखा. उगाच तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, असेही सुनावले. 

महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याच्या खर्चाचा आकडा आला समोर

संजय राऊत आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वादविवाद सुरू आहेत. 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजीनामे दिले पाहिजेत, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्याला उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी उत्तर दिले होते. शिवसेना नाव काय वंशजांना विचारून दिले होते का, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यानंतर गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीसमोर नतमस्तक होण्याचे काम प्रत्येकाचेच आहे. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे आमचे मित्र आहेत. ते अत्यंत संयमी नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. साताऱ्यातील गादीचे शिवेंद्रराजे भोसले संयमाने बोलतात. त्यांचे वडील अभयसिंहराजे भोसले यांच्यासारखा सज्जन माणूस मी राजकारणात पाहिला नाही. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यासुद्धा शिवसेनेमध्ये होत्या. त्या शिवसेनेच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या. या सगळ्या वारसदारांचे शिवसेनेशी कायम चांगले संबंध आहेत. त्यामुळे उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नाव वंशजांना विचारून दिले होते का, या प्रश्नाला काही अर्थ नाही.

लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. लोक आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना, राष्ट्रपतींनाही प्रश्न विचारतात. प्रश्न विचारले म्हणून  तंगड्या तोडण्याची भाषा कोणी करू नये, असे त्यांनी सांगितले.

सतत उत्साही, प्रफुल्लित राहण्यासाठी ट्विटरचे CEO काय करतात माहितीये?

रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी पूर्वीच्या काळापासून ते शरद पवारांपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक नेता झटलेला आहे. त्यासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबात जन्म घेण्याची गरज नाही, असेही संजय राऊत म्हणाले.