पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या रिकाम्या जागांवर भाजीपाला लावण्यास बंदी

पश्चिम रेल्वे

मुंबईत रेल्वेरुळाच्या बाजूने असलेल्या जागेवर कोणत्याही भाजीपाल्याचे किंवा इतर लहान पिक लावण्यास पश्चिम रेल्वेने बंदी घातली आहे. यापुढे कर्मचाऱ्यांना यासाठी आवश्यक परवाना देण्यात येणार नाही. त्याचबरोबर ही जागा तातडीने रिकामी करावी, असेही आदेश पश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, मध्य रेल्वेकडूनही रुळांच्या बाजूने घेण्यात येणाऱ्या भाजीपाल्याच्या पिकासाठी कोणते पाणी वापरले जाते, याचा आढावा घेतला जाणार असून, यामध्ये कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधितांचा परवाना रद्द केला जाईल, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

रेल्वेरुळांजवळील जागेवर भाजीपाल्याची किंवा इतर पिके घेण्यासाठी सांडपाण्याचा वापर केला जाऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिले होते. रेल्वेमध्ये कनिष्ठ स्तरावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वेरुळांजवळील रिकाम्या जागेवर छोटी पिके घेण्यास मंजुरी देण्यात आली होती. पण उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता पश्चिम रेल्वेने यावर बंदी घातली आहे.

पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कर्मचाऱ्यांना नव्याने कोणताही परवाना देण्यात येणार नाही. जुने परवाने आधीच संपलेले आहेत. संबंधित जागा तातडीने खाली करण्याचे आदेशही आम्ही संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत. यापुढे कोणताही परवाना देण्यात येणार नाही.

दरम्यान, रेल्वेरुळांजवळील जागा वापरली गेली नाही, तर त्यावर अतिक्रमण होण्याची भीती काही कर्मचाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. रेल्वेच्या रिकाम्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठीच खरंतर या जागा कर्मचाऱ्यांना छोटी पिके घेण्यासाठी देण्यात आल्या होत्या. एकदा रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण झाले तर ते काढणे जास्त अवघड असते, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.