पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुरुंगाऐवजी रमेश कदम ठाण्यातील फ्लॅटमध्ये, तिथूनच लाखोंची रोकड जप्त

आमदार रमेश कदम

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्या एका सहकाऱ्याच्या फ्लॅटमधून ठाणे पोलिसांनी तब्बल ५३.४३ लाख रुपयांची रोकड जप्त केली. विशेष म्हणजे यावेळी रमेश कदमही तिथे उपस्थित होते. कारागृहात असलेले रमेश कदम या फ्लॅटमध्ये कसे पोहोचले, यावरून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या फ्लॅटच्या मालकांना अटक केली आहे.

सातारा सभा : मुसळधार पावसात उदयनराजेंवर कडाडले शरद पवार

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश कदम यांना अस्वस्थ वाटत असल्याने शुक्रवारी त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्यांची संपूर्ण तपासणी करण्यात आल्यावर त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिस त्यांना परत कारागृहात घेऊन जात होते. यावेळी रमेश कदम यांनी आपल्याला ठाण्यातील घोडबंदर परिसरातील आपल्या सहकाऱ्याकडे जायचे आहे, अशी विनंती केली. पोलिसांनीही त्यांची विनंती मान्य केली. यानंतर ते घोडबंदर रोडवरील फ्लॅटमध्ये पोहोचल्यावर त्याच ठिकाणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एका पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये फ्लॅटमधून ५३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. 

ज्या ठिकाणी ही घटना घडली. तेथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱी घटनास्थळी दाखल झाले. ही सर्व रक्कम पोलिसांनी प्राप्तिकर विभागाच्या ताब्यात दिली आहे. एवढी रक्कम या फ्लॅटमध्ये कशी आली, ती कोणाच्या मालकीची होती, रमेश कदम या ठिकाणी कशासाठी आले होते, पोलिस त्यांना येथे का घेऊन आले, याचा तपास करण्यात येतो आहे. 

...तर नेहरुंनाही वीर जवाहरलाल नेहरु म्हणेन : उद्धव ठाकरे

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कारभारात १५० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांच्या आरोपावरून रमेश कदम यांना २०१५ मध्ये अटक करण्यात आली आहे. ते यावेळीही मोहोळमधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना अर्ज भरण्यासाठी न्यायालयाने तीन दिवसांचा जामीनही मंजूर केला होता. सध्या ते कारागृहात असले तरी त्यांची मुलगी रिद्धी मतदारसंघात त्यांचा प्रचार करते आहे.