इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विरोधात आवाज उठवल्यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे. कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. याप्रकरणात त्यांना २२ ऑगस्ट रोजी ईडीसमोर हजर रहावे लागणार आहे.
राज ठाकरे यांना ईडीची नोटीस, २२ रोजी चौकशी
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी काही कार्यकर्त्यांसह सोमवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. केंद्रानंतर आता राज्यात सत्ता हवी असल्यामुळे सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. आमच्या पक्षातील काही नेत्यांवरही अशा प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. सरकार कारवाईचे हे हत्यार किती लोकांवर वापरणार आहे. हिंमत असेल तर त्यांनी जेल भरो आंदोलन करावे. ईव्हीएम विरोधात राज ठाकरेंनी पुढाकार घेऊन अनेक पक्षांना एकत्रित केले आहे. कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन करण्यास आम्ही सज्ज आहोत. मनसे कार्यकर्त्यांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस राज ठाकरेंच्या पाठिशी आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
राज ठाकरेंच्या चौकशीबाबत काहीच वाटत नाही, संजय राऊतांचे वक्तव्य
मुंबईतील कोहिनूर सीटीएनएल कंपनीची जागा राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांनी खरेदी केली होती. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएलएफएस) या सरकारी क्षेत्रातील कंपनीने संबंधितांना ८६० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र त्यानंतर आयएलएफएसचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आता या कर्ज प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात भागीदार म्हणून राज ठाकरेंना २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.